मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येची छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमावरून प्रसारित झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. त्यामुळे नैतिकता आणि तब्येत बरी नसल्याचे कारण देत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती व तशी तंबीही दिली होती. दरम्यान, मुंडे यांच्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी टीकेची झोड उठविली असून हत्येनंतर सुमारे अडीच महिन्यांनी त्यांना नैतिकता कशी आठवली, असा सवाल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरपंच देशमुख यांची हत्या झाल्यापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली होती. दोघांनी तीन-चार वेळा चर्चाही केली होती. पण मुंडे राजीनाम्यासाठी तयार नव्हते. देशमुख यांच्या क्रूर हत्येची छायाचित्रे प्रसिद्ध होताच मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी फडणवीस व पवार यांच्यावर दबाव वाढला होता. विरोधकांची आक्रमक भूमिका, राज्यभरात उसळलेला संताप व सुरू झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस व पवार यांची चर्चा झाली होती.

प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्याने अखेर मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. आजच्या आज राजीनामा न दिल्यास हकालपट्टीची तंबी फडणवीस यांनी दिल्यानंतर मुंडे यांचा नाईलाज झाला. त्यांचा राजीनामा फडणवीस यांनी लगेच स्वीकारून राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविला. दरम्यान, हत्याप्रकरणात मुंडे यांना सहआरोपी करून त्यांचीही चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. त्यासाठी राज्यात आंदोलने सुरू असल्याने मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून राजीनामा!

संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. त्याची छायाचित्रे सोमवारी समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यावर ते पाहून माझे मन अत्यंत व्यथित झाले. हत्याप्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे आणि न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे. त्यामुळे माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून मी राजीनामा देत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने व काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने वैद्याकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे.

आरोपपत्रांबरोबर पुरावेही सादर

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रमुख सूत्रधार तथा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड असून त्याच्याबरोबर सहभागी असलेल्या सर्व आरोपींविरोधात ‘मकोका’ कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. या निर्घृण हत्येची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती तपासपथकाच्या ताब्यात आहेत. न्यायालयात आरोपपत्र सादर केल्यानंतर त्याबरोबर हे पुरावेही देण्यात आले आहेत.

चित्रफितींमध्ये काय?

● मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी खंडणी मागण्याला विरोध केल्यावरून त्यांना अत्यंत क्रूरतेने संपवण्यात आले. आरोपींनी लोखंडी गजाने त्यांना मारहाण केली. दुचाकीच्या क्लचवायरने देशमुख यांना फरफटत नेण्यात आले. त्यांच्या छातीवर बुटासह पाय ठेवून उभे राहण्यात आले. एवढेच नव्हे तर पाणी मागताना एका आरोपीने त्यांच्यावर लघुशंका केली.

● देशमुख यांना मारहाण करतानाचे छायाचित्रण, चित्रफिती काढण्यात आल्या. यावेळी आरोपी हसत होते. ‘तुझा बाप आहोत आम्ही’, असेही ते म्हणत होते. ही छायाचित्रे, चित्रफिती आरोपींच्या ‘मोकारपंती’ या ग्रुपवर (गटावर) प्रसारित करण्यात आल्या.

● हा ऐवज तपास यंत्रणेला आढळल्यानंतर त्यांनी दोषारोपपत्रात सर्व पुरावे म्हणून समाविष्ट केले. त्यानंतर हत्येचा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मीक कराडला आरोपी क्रमांक १ करण्यात आले.

पडद्यामागे भाजपची खेळी?

● संतोष देशमुख या भाजपचा बूथप्रमुख असलेल्या सरपंचाची हत्या झाल्याने भाजपच्या वरिष्ठ पातळीवर तीव्र प्रतिक्रिया होती. धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचेही निकटवर्तीय. फडणवीस व अजितदादांमधील मध्यस्थ किंवा उभयतांना जवळ आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले. पूर्वी भाजयुमोचे अध्यक्ष असलेल्या मुंडे यांच्या विरोधात भाजपनेच आक्रमक भूमिका घेतली.

● बीडमधील हत्येचे प्रकरण भाजपकडून पद्धतशीरपणे तापविण्यात आले. अजित पवारांकडून मुंडे यांना वाचविण्याचे प्रयत्न झाले. भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी मुंडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशीच भूमिका घेतली. त्यावर राजीनाम्याचा निर्णय मुंडेच घेतील, असे सांगत चेंडू त्यांच्या न्यायालयात टोलावला. शेवटी फडणवीस यांनी सोमवारी रात्री अजितदादांच्या निवासस्थानी जाऊन राजीनामा द्या, अन्यथा हकालपट्टी करावी लागेल, असा इशारा दिला. परिणामी अजित पवारांचाही नाईलाज झाला आणि मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला.

घटनाक्रम

● बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या.

● मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय वाल्मीक कराडसह विष्णू चाटे व सुदर्शन घुलेंवर ११ डिसेंबर रोजी अवादा कंपनीला दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

● देशमुख हत्या प्रकरणी सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार व कृष्णा आंधळे यांच्यावर खुनाचा गुन्हा, याच आरोपींवर कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचाही गुन्हा.

● आरोपी जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार यांना अटक.

● देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडून विशेष तपास समिती नियुक्त करण्यात येत असल्याची घोषणा.

● हिवाळी अधिवेशनात हत्या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करणार असल्याची घोषणा. तसेच न्यायालयीन समिती गठित

● ३१ डिसेंबरला वाल्मीक कराड हा पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागापुढे स्वत:हून हजर.

● मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक.

● खून प्रकरणातील ७वा आरोपी कृष्णा आंधळे फरारच

● १४ जानेवारी रोजी वाल्मीक कराडसह इतर आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मकोका) कलमान्वये गुन्हा दाखल.

● मकोकाच्या गुन्ह्यात आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी.

● २६ जानेवारी रोजी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना अटक.

● २७ फेब्रुवारी रोजी खून प्रकरणाच्या ८० व्या दिवशी सीआयडीकडून १ हजार ४०० पानांचे दोषारोपपत्र.

● दोषारोपपत्रात कराडच देशमुख यांच्या हत्येमागचा मुख्य सूत्रधार.

धनंजय मुंडे प्रकृती अस्वस्थ असल्याने राजीनामा दिल्याचे म्हणत आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचा दावा केला. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिला असेल तर, इतके छायाचित्र आणि चित्रफिती समोर आल्यानंतरसुद्धा त्यांचा राजीनामा का घेण्यात आला नाही, सरकारने याचे उत्तर द्यावे. उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट)

देशमुख यांची हत्या अत्यंत क्रुरपद्धतीने केली, याची गृहखात्याकडे माहिती असूनही मुख्यमंत्र्यांनी ही माहिती लपवली. मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न देता थेट प्रसार माध्यमांना दिली, हा सभागृहाचा अपमान आहे. – नाना पटोले, काँग्रेस नेते

राजीनामा दिल्यानंतर मुंडे यांनी वैद्याकीय कारणामुळे तो देत असल्याचे स्पष्ट केले. मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ सांगत आहेत. मुंडे यांच्या प्रतिक्रियेत नैतिकतेचा कुठेही उल्लेख नाही. हा विरोधाभास आहे. – सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी (शरद पवार)

मुंडे यांचा देशमुख हत्याप्रकरणाशी संबंध नाही. मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर जबाबदार राजकीय नेता म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे. देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका पक्षाची होती. – सुनील तटकरे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित

राज्यातील परिस्थिती पाहता जनतेला न्याय द्यायचा असेल, तर हे सरकारच बरखास्त झाले पाहिजे. देशमुख यांच्या हत्येची छायाचित्रे व ध्वनिचित्रफिती पाहून त्यांच्या परिवाराचे काय होत असेल, याचा विचारही करू शकत नाही. आदित्य ठाकरे, आमदार, ठाकरे गट

राज्यातील जनतेच्या लढ्यामुळे मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. खंडणीच्या बैठका मुंडे यांच्या निवासस्थानी झाल्याचे भाजपच्या एका आमदारानेच सांगितल्याने मुंडे यांना सहआरोपी करावे.– रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)