सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील अकरा दिवसांपासून ते ब्रीचकँडी रुग्णालयात करोनाच्या आजारामुळे दाखल होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. मुंडे यांच्यासोबत करोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव तसेच आणखी एक स्वीय सहाय्यक दोन वाहन चालक एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सर्वांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली आहे .
धनजंय मुंडे यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता. १२ जून रोजी धनंजय मुंडे व त्यांच्या काही कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लगेच त्याच दिवशी मुंडे यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे खासगी सचिव प्रशांत भामरे व जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अन्य चार कर्मचाऱ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू करण्यात आले. भामरे, जोशी व दोन चालक यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. आता केवळ एक अंगरक्षक व एक कुक हे दोघेच जण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती ही सुधारत आहे