मधु कांबळे

शाळा, व्यायामशाळा व प्रार्थनास्थळे खुली करण्यास मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी उत्सुकता दाखविली आहे. टाळेबंदीमुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत, त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना लागू करून सर्व व्यवहार आता सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे मत काही मंत्र्यांनी व्यक्त केले.

देशात व राज्यात करोना साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी २४ मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली. राज्यात त्याआधीपासून टप्प्याटप्प्याने टाळेबंदीकडे वाटचाल सुरू होती. गर्दीतून करोनाचा संसर्ग वाढतो, त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळून रेल्वे, बस, शाळा, व्यायामशाळा, तरणतलाव, हॉटेल, मॉल्स, बाजार संकुले यांना सर्वप्रथम टाळे ठोकण्यात आले. दीड-दोन महिन्यांनंतर काही निर्बंध शिथिल करून अत्यावश्यक सेवेबरोबर करोना प्रतिबंधात्मक नियमावली लागू करून इतर दुकाने, निवासी व्यवस्था असलेली हॉटेल्स, मैदानातील व्यायाम व्यवस्था सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर आंतरजिल्हा प्रवासाची मुभा देण्यात आली. परंतु शाळा, व्यायामशाळा, प्रार्थनास्थळे अजून बंदच आहेत. त्याबाबतही लवकर निर्णय व्हावा, अशी मागणी होत आहे.

केंद्र सरकारने २९ जुलै रोजी अधिसूचना जारी करून देशात ३१ ऑगस्टपर्यंत टाळेबंदीची मुदत वाढविली. त्यात इतर काही व्यवहारांना सूट दिली असली तरी शाळा, व्यायामशाळांना बंदीच घालण्यात आली आहे. प्रार्थनास्थळे खुली कधी करायची, याचा निर्णय घेण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर सोपविण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अधिसूचनेला अनुसरून राज्य सरकारनेही राज्यात टाळेबंदीची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविली. राज्यात जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले, परंतु सध्या शाळा बंदच असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्याला मर्यादा आहेत, प्रत्यक्ष शाळा सुरू होणे आवश्यक आहे. परवानगी मिळाली तर सप्टेंबरपासून राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची शिक्षण विभागाची तयारी आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांनी त्याला दुजोरा दिला.

व्यायामशाळांबाबत लवकरच निर्णय – वडेट्टीवार

लोकांच्या हिंडण्याफिरण्यावर निर्बंध आल्याने, घरात बसून लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आरोग्याचे नवीन प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. त्याचाही विचार करून आता सर्व व्यवहार सुरू करण्याची गरज आहे, अशी चर्चा मंत्र्यांमध्ये सुरू आहे. व्यायामशाळा सुरू करणे आवश्यक आहे आणि त्याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी शक्यता मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. खबरदारीच्या उपाययोजना, नियमावली लागू करून, प्रार्थनास्थळे खुली करायला हरकत नाही; परंतु हे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले.