मुंबई : आमच्यावर गद्दारीचा शिक्का मारता मग, अजित पवार सुद्धा फुटुन आले आहेत. त्यांच्याविषयी गप्प का बसता, असा सवाल पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केला. राज्याचा सर्वाधिक दौरा करणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची इतिहास दखल घेईल, असा दावा पाटील यांनी केला.
आझाद मैदानावर आयोजित शिवसेना दसरा मेळाव्यातील सभेत नेतेमंडळी किंवा मंत्र्यांपैकी रामदास कदम, गुलाबराव पाटील आणि ज्योती वाघमारे या तिघांची भाषणे झाली .
हेही वाचा >>> भाजप महाशक्ती तरीही, उचलेगिरी कशासाठी? सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल
राज्यात भगव्याची लाट असताना तुम्ही काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करण्यासाठी हिंदूत्व सोडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, असा गंभीर आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला. कदम यांनी यावेळी मराठा समाजाच्या सर्वेक्षणाची मागणी राज्य सरकारकडे केली. ते म्हणाले, राम मंदिर बनवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले.
शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी ठाकरे परिवारावर टीकास्त्र सोडले. काँग्रेस व समाजवादी पक्षासमोर नाक घासत असून त्यांनी ठाकरे आडनाव बदलावे, असा सल्ला त्यांनी उद्धव यांना दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर येण्यापूर्वी तिघा नेत्यांची भाषणे झाली. तत्पूर्वी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे मंगेश चिवटे यांनी कक्षाच्या मदतीची माहिती दिली. भाषणापूर्वी गायक नंदेश उमप यांच्या पोवाडय़ांनी वातावरणात जान आणली. मनिष राजगिरे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आधी पार पडला.