मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या पुण्यातील स्वारगेट स्थानकात घडलेल्या घटनेच्या निमित्ताने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या अनुषंगाने नुकतीच एसटी महामंडळ आणि पोलिसांची एक तातडीची बैठक आयोजित करून या घटनेचा विस्तृत आढावा घेण्यात आला. दरम्यान, एलटी स्थानकांमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार असून एसटी महामंडळात एक सुरक्षा रक्षक समिती स्थापन करून त्यात आयपीएस दर्जाचा सुरक्षा अधिकारी नेमण्यात येणार असल्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर २५ फेब्रुवारी बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. आरोपी दत्तात्रय गाडेने तरुणीकडे वाहक असल्याची बतावणी केली होती. तरुणीवर बलात्कार करून पसार झालेल्यागाडेला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. गाडेला १२ मार्चपर्यंत पोलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर माधुरी मिसाळ यांनी एसटी महामंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची शनिवारी आढावा बैठक घेतली. यावेळी पोलीस प्रशासन, एसटी महामंडळ, परिवहन विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य परिवहन (एसटी) महामंडळामध्ये पूर्वीसारखे सुरक्षा दक्षता अधिकारी नव्याने नेमण्यात येतील. तसेच पोलिसांची गस्त वाढविण्यात येईल. स्वारगेट स्थानकात यापूर्वी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या संख्येत आता वाढ करण्यात येईल. महिला सुरक्षेच्यादृष्टीने अधिक उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर या उपाययोजना करण्यात येतील. या प्रकरणाच्या तपासात जे कोणी अधिकारी किंवा ठेकेदार दोषी आढळतील त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांच्या आवारात तक्रार निवारण कक्ष, तक्रार नोंदवण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक दिला जाईल. तसेच खासगी बस चालकांची एसटी स्थानकात होणारी घुसखोरी रोखण्यासाठीही उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्याचे माधुरी मिसाळ यांनी सांगितले. परिवहन विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने प्रवाशांच्या सुरक्षा यंत्रणेसंबंधी विस्तृत आढावा घेऊन विशेषत: महिलांच्या सुरक्षेत अधिक सुधारणा करण्यात येईल. दरम्यान, केंद्र सरकारच्या स्क्रॅप धारणानुसार राज्यातील सर्व आगारातील आयुर्मांन संपुष्टात आलेल्या बसगाड्या येत्या १५ एप्रिलपर्यंत भंगारात काढल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.