शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या परदेशवारीवरून जनतेच्या पैशावर सहलीला जात असल्याचा आरोप केला. तसेच सातत्याने मंत्री आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या सुरू असलेल्या परदेशवाऱ्यांवर टीका केली. “आम्ही प्रश्न उपस्थित केल्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या परदेशवाऱ्या रद्द झाल्या,” असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. यानंतर आता उदय सामंत यांनी लंडन दौऱ्यातील खर्चाचा हिशोब मांडत या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
उदय सामंत म्हणाले, “माझ्या लंडन दौर्याचा खर्च कोणी केला? त्याचे उत्तर हे आहे. २७ सप्टेंबर २३ रोजी ट्रॅव्हल कंपनीला दिलेला धनादेश आणि त्याची पोच पावतीही आहे. संपूर्ण दौऱ्यात राहण्याचा आणि प्रवासाचा खर्चही मी स्वतः केलेला आहे. असं असलं तरी मी विचारलेल्या २०२२ च्या दावोस दौऱ्याच्या प्रश्नांची उत्तरे अजून मिळालेली नाहीत. असो आता मी ते विचारणार नाही. जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा संबंधितांनी त्याची उत्तरे द्यावीत. माझ्यासाठी हा विषय संपला आहे.”
“महाराष्ट्र २०१९ नंतर उद्योग जगतात पुन्हा पहिल्या क्रमांकावर”
“महाराष्ट्र २०१९ नंतर उद्योग जगतात पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे आणि भविष्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक टिकवण्यासाठी महायुती सरकार कसोशीने प्रयत्न करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र,” असंही उदय सामंत यांनी नमूद केलं.
आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?
आदित्य ठाकरे म्हणाले होते, आमचा कुठेही वैयक्तिक वाद नाही. परंतु, जनतेच्या पैशावर यांनी सहलीला जाऊ नये, असं आमचं म्हणणं आहे. आता उद्योगमंत्री उदय सामंत लंडनला जाणार आहेत. तिथे म्हणे गोलमेज परिषद होणार आहे. परंतु, ही गोलमेज परिषद कोणाबरोबर असणार आहे, या सहलीतून राज्याला किती गुंतवणूक मिळणार आहे, हे राज्यातील जनतेला समजलं पाहिजे.”
“तिथे हे काय ट्रॅफिकचे कोन लावायला जाणार आहेत का?”
“उद्योगमंत्री तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉन्फरन्समध्ये जाऊन चर्चा करणार आहेत, असं सांगण्यात आलं आहे. परंतु, इथे सरकारच आर्टिफिशियल (कृत्रिम) आहे. त्यानतर परदेश दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी उदय सामंत दाव्होसला जाऊन पाहणी करणार आहेत. ज्या दाव्होसमध्ये जानेवारीपर्यंत वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचे लोक येत नाहीत, तिथे हे स्वतः जाऊन कसली पाहणी करणार आहेत? तिथे हे काय ट्रॅफिकचे कोन लावायला जाणार आहेत का? यांनी पालकमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्यात पाहणी करावी,” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा : उदय सामंत यांचे नारायण राणे यांनाच आव्हान
“जनतेच्या पैशावर यांनी सहली करू नयेत”
“खारघरमध्ये जी दुर्दैवी घटना घडली, त्याची यांनी काय पाहणी केली ते आपल्याला माहितीच आहे. त्या घटनेचा अहवाल अद्याप आलेला नाही. दाव्होसनंतर हे (उदय सामंत) म्युनिकला जाणार आहेत. आमचा मुद्दा हाच आहे की जनतेच्या पैशावर यांनी सहली करू नयेत,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती.