लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश असून ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि भाजपबरोबर दीर्घकाळ असलेले रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांचा अपेक्षेनुसार केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला भोपळा मिळाल्यानंतर अर्थ राज्यमंत्रीपदावरील भागवत कराड यांना या मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे.

तीन वेळा खासदार असलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसून पुण्यातून प्रथमच निवडून आलेल्या मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. उत्तर महाराष्ट्रातील रावेरमधून तिसऱ्यांदा निवडून आलेल्या ओबीसी व महिला नेत्या म्हणून रक्षा खडसे, तर शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ खासदार प्रतापराव जाधव यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जाती, ओबीसी, मराठा, मराठी, गुजराती अशा विविध जातींच्या नेत्यांना प्रतिनिधित्व देताना विभागीय समतोल साधण्याचाही प्रयत्न केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि पीयूष गोयल या मोदींच्या आधीच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा अपेक्षेनुसार पुन्हा समावेश झाला आहे. नागपूरचे गडकरी हे मराठी भाषक असून गोयल मुंबईतील गुजराती भाषक खासदार आहेत. आठवले हे भाजपबरोबर गेली अनेक वर्षे असून त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.

हेही वाचा >>>पवई भीमनगरमध्ये पोलिसांची दडपशाही? बेदम मारहाणीचा व्हिडीओ जितेंद्र आव्हाडांकडून पोस्ट; म्हणाले, “हा रुमाल बांधलेला माणूस…”

मराठवाड्यातील खासदार भागवत कराड हे मोदींच्या आधीच्या मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री होते. मात्र त्यांचा या लोकसभा निवडणुकीत फारसा प्रभाव दिसला नाही आणि भाजपला मराठवाड्यात भोपळाच मिळाला. त्यानंतर कराड यांनाही यावेळी डच्चू मिळाला आहे. रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे निवडणुकीत पराभूत झाल्याने या मंत्रिमंडळात मराठवाड्याला प्रतिनिधित्व मिळालेले नाही. राज्यसभेतील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आग्रहामुळे भाजपने शेवटच्या क्षणी त्यांना साताऱ्यातून उमेदवारी दिली. राज्यात मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या वादाचा भाजपला मराठवाड्यात फटका बसला. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे अपेक्षित होते. मात्र उदयनराजेंचा मंत्रिमंडळात समावेश झालेला नाही. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यातून पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे.

भाजपच्या चार जणांचा समावेश

उत्तर महाराष्ट्रातील रावेरमधून तिसऱ्यांदा निवडून आल्याने ओबीसी समाजातील महिला खासदार रक्षा खडसे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेते व बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांपैकी चार खासदार भाजपचे, एक शिवसेना व एक रिपब्लिकन पक्षाचे आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ministers nitin gadkari piyush goyal and republican party ramdas athawale were inducted into the union cabinet amy
Show comments