लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मंत्रालयात जाऊन आरोग्य विभागातील लिपिकाला मारहाण केल्याच्या आरोप प्रकरणातून प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांची विशेष न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष सुटका केली.
वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या उमेदवाराकडून पैशांची मागणी केल्याप्रकरणी कडू यांनी मंत्रालयातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यालयात जाऊन लिपिकाला कानशिलात लगावली होती. तसेच, त्याला हाताला धरून तत्कालीन आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्या स्वीय सचिवाच्या दालनात खेचत नेले होते. जानेवारी २०११ मध्ये ही घटना घडली होती. आपला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीशी काहीही संबंध नसताना कडू यांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा करून तक्रारदार लिपिकाने मरीन ड्राईव्ह पोलिसांत कडू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी कडू यांच्यावर सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे, त्याला काम करण्यापासून परावृत्त करणे आदी आरोपांप्रकरणी खटला चालवण्यात आला.
आणखी वाचा-मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक
आमदार – खासदारांवरील खटल्यांसाठी स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. यू. कदम यानी या प्रकरणी शुक्रवारी निकाल देताना कडू यांची त्यांच्यावरील आरोपांतून निर्दोष सुटका केली. न्यायालयाच्या निकालाची प्रत रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती.
© The Indian Express (P) Ltd