बाटलीबंद पाणीपुरवठा घोटाळ्यानंतर रेल्वे स्थानकांत विक्री करण्यात येणारे बाटलीबंद पाणी केवळ ‘रेलनीर’चेच असावे, असे सक्त आदेश रेल्वे मंत्रालयाने जारी केले आहेत. मात्र या आदेशामुळे अनेक स्थानकांत तसेच टर्मिनसवर बाटलीबंद पाण्याचा तुटवडा झाल्याने प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
गेल्या दीड महिन्यापूर्वी रेल्वे मंत्रालयाने बाटलीबंद पाण्याच्या पुरवठय़ावरून झालेल्या घोटाळ्यानंतर तातडीने खासगी कंपन्यांचा पुरवठा बंद केला होता. त्यामुळे पाणीपुरवठय़ाचा संपूर्ण भार रेलनीरवर आला आहे. मात्र रेलनीरची उत्पादनक्षमता कमी असल्याने अनेक ठिकाणी प्रवाशांचे पाण्याशिवाय हाल होत आहेत. त्यामुळे रेल्वेमार्गावरील अनेक स्टॉल्सवर पाण्याऐवजी इतर पेयांची विक्री वाढली आहे.
याबाबत आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, पाणीपुरवठा कमी होत असल्याचा मुद्दा त्यांनी मान्य केला आहे, परंतु आयत्या वेळी उत्पादनक्षमता वाढवणे शक्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यातच अंबरनाथ येथील कारखाना स्वच्छतेच्या कारणास्तव दोन दिवस बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे मागणी अचानक वाढल्याने त्यांनी स्पष्ट केले. बाटलीबंद पाण्याच्या पुरवठय़ाबाबत प्रवाशांना कोणतीही कल्पना रेल्वेच्या वतीने देण्यात आली नसल्याने स्टॉलधारक आणि प्रवाशांमध्ये वाद झडत आहेत. अशातच काही ठिकाणी जादा रक्कम आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत.

Story img Loader