कार चालवण्याची हौस असणारी असंख्य मंडळी आपल्या आसपास असतात. विशेषत: नुकत्याच वयात आलेल्या अनेक मुलांना हातात कार घेण्याची इच्छा असते. पण अनेकदा त्यांच्या या हौसेचं भयंकर परिणामात रुपांतर होण्याचा धोका असतो. मुंबईत नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेमुळे हीच बाब अधोरेखित झाली आहे. एका अल्पवयीन मुलानं याच हौसेखातर गंमत म्हणून आपल्या वडिलांची सेडान कार चालवायला घेतली. पण त्याचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि झालेल्या अपघातात एक पुरुष व एक महिला अशा दोन जणांचा बळी गेला!
मुंबईच्या गिरगाव चौपाटीजवळ घडली घटना!
ही घटना बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबईच्या गिरगाव चौपाटीजवळ घडली. या अपघातामध्ये बाईकचालक अकबर दाऊद खान (४७) आणि किरण अन्वर खान (३६) यांचा मृत्यू झाला आहे. यातील अकबर खान यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर किरण खान रुग्णालयात उपचार चालू असताना त्या मरण पावल्या. अकबर त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी किरण यांच्यासमवेत नजीकच्या हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यानंतर त्यांनी मरीन ड्राईव्ह प्रॉमेनाडजवळ काही वेळ घालवला. तिथून निघाल्यानंतर काही वेळातच हा अपघात झाला.
नेमकं घडलं काय?
बुधवारी पहाटे आपल्या वडिलांची होंडा अकॉर्ड सेडान कार घेऊन १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा भोईवाड्याहून नरीमन पॉइंटच्या दिशेने निघाले होते. गिरगाव चौपाटीच्या नजीक कॅफे आयडियलजवळ बाईकवर असणाऱ्या अकबर खान उजवीकडे वळाले. मात्र, नेमकी त्याच वेळी मागून येणाऱ्या होंडा अकॉर्डनं बाईकला जोरात धडक दिली. या धक्क्यामुळे अकबर लाब फेकले गेले. त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यामागे बाईकवर बसलेल्या किरण खान यांचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
पोलीस तपासात काय आढळलं?
पोलिस तपासात या कारमध्ये अल्पवयीन मुलाबरोबरच त्याचा एक अल्पवयीन मित्रही असल्याचं स्पष्ट झालं आहे. या अल्पवयीन मुलानं कार घेऊन जात नसल्याचं घरी सांगितलंच नव्हतं. किंबहुना, त्यानं आपण सायकलवर रपेट मारायला निघाल्याचं सांगितलं. मात्र, घरातून निघताना त्यानं कारची चावीही घेतली. कार बऱ्याच दिवसांपासून चालवली गेली नसल्यामुळे तिचे ब्रेक लवकर लागत नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच ड्रायव्हिंग करणाऱ्या मुलाला वेळेवर ब्रेक लावता आले नसल्याचंही सांगितलं जात आहे.
मुलाच्या पालकांवरही कारवाई होणार?
दरम्यान, मुलगा अल्पवयीन असल्यामुळे नेमकी कारवाई कुणावर आणि कशी होणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात डी. बी. मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अल्पवयीन मुलावर रॅश ड्रायव्हिंग आणि बेजबाबदार ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या वडिलांवरही परवाना नसताना मुलाला कार चालवू दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अल्पवयीन मुलाला त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात आलं असून चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.