ठाण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सातवी इयत्तेत शिकणारी मुलगी..वय जेमतेम १२ वर्षांचे. एवढय़ा लहान वयात हातात मोबाइल आला आणि कुसंगतीमुळे दारूचे आकर्षण निर्माण झाले. या दोन गोष्टींनीच सोमवारी तिचा घात केला. जेमतेम आठ दिवसांपूर्वी ‘व्हॉट्सअॅप’वर ओळख झालेल्या मित्रासोबत ‘फ्रेण्डशिप डे’ निमित्त दारूपार्टीत सहभागी झालेल्या या मुलीवर तिच्या मित्राने अतिप्रसंग केला. ठाण्यातील एका सामूहिक बलात्काराच्या तक्रारीचा तपास करताना वागळे इस्टेट पोलिसांसमोर ही कहाणी उजेडात आली आणि साऱ्यांनाच धक्का बसला.  
ठाणे येथील कापुरबावडी परिसरात ही मुलगी राहते. तिची आई घरकाम तर वडील मुंबईतील एका कंपनीत काम करतात. वाईट मित्रांच्या सोबतीत राहून या मुलीला मद्यप्राशनाची सवय लागली. त्यातच आई-वडिलांनी मोठय़ा हौसेने तिला मोबाइल घेऊन दिला. ढोकाळी परिसरातील एका मित्राच्या माध्यमातून मनोरुग्णालयाजवळील वस्तीतील एका तरुणाशी ‘व्हॉट्सअॅप’वर तिची मैत्री जमली. जेमतेम आठ दिवसांची ही ‘मैत्री’ ‘फ्रेण्डशिप डे’च्या निमित्ताने साजरी करण्यासाठी सोमवारी सायंकाळी तीन हातनाका येथील इटर्निटी मॉलच्या परिसरात भेटण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे सायंकाळी मित्रांचा गोतावळा जमला. तेथेच मद्यप्राशनाचा बेत आखला गेला.  मनोरुग्णालय परिसरातील वस्तीतील एका घरात ही दारूपार्टी सुरू झाली. थोडा वेळ मद्यपान झाल्यानंतर तिच्या ‘व्हॉट्सअॅप’ मित्राने दुसऱ्या मित्राला सिगारेट आणण्यासाठी पाठवले आणि ती एकटी असल्याचे पाहून तिच्यावर अतिप्रसंग केला. त्याच वेळी तेथे पोहोचलेल्या या तरुणाच्या एका नातेवाईकाने हा प्रकार पाहून तरुण व त्याच्या मित्राला मारहाण केली व मुलीला घरी सोडण्यास सांगितले. त्या दोघांच्या सांगण्यावरून तेथे पोहोचलेल्या तिच्या ढोकाळी येथील मित्रासोबत ती मुलगी आपल्या घरी निघाली. मात्र, वाटेतच तिच्या मामाने तिला दारूच्या नशेत पाहून हटकले. आता घरच्यांना सगळा प्रकार कळेल, अशी भीती वाटू लागल्याने तिने आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार केली. वागळे इस्टेट पोलिसांनीही वेगाने तपासाची सूत्र हलवली. मात्र, सखोल चौकशीदरम्यान खरी माहिती उघड झाली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्या तरुणाला अटक केली असून त्याच्या दोन मित्रांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Story img Loader