पोलीस दप्तरी मात्र ‘बेपत्ता’ झाल्याची नोंद
कोपरखैरणे येथील पालिका शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे गेल्या महिन्यात शेजारच्या दोन तरुणांनी अपहरण केले असून पोलिसांनी मात्र या प्रकरणाची केवळ बेपत्ता म्हणून तक्रार नोंदवून बघ्याची भूमिका घेतली आहे. नवी मुंबई प्रकल्पग्रस्त माहिला आघाडीनेही यासंदर्भात पोलिसांना लक्ष घालण्याची विनंती केल्यानंतरही त्यांच्या पत्राला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.
कोपरखैरणे सेक्टर एक मधील टिंबर मार्टच्या जवळ चुनीलाल राजपाल (नाव बदलेले आहे) कुटुंब गेली अनेक वर्षे रहात आहे. त्यांची १५ वर्षीय बिंदू ( नाव बदलेले आहे) ही मुलगी जवळच्या पालिका शाळेत ९ वी मध्ये शिकत होती. १९ नोव्हेंबर रोजी ती अचानक घरातून गायब झाली. दुसऱ्या दिवशी मुलीच्या आईवडिलांनी जवळच्या कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार केली. आपल्या मुलीचे याच भागातील सोनू उर्फ सरफरोश आणि अकबर या तरुणांनी अपहरण केल्याचे समजल्यानंतर राजपाल कुटुंबाने तशी तक्रार पोलीस ठाण्यात केली मात्र केवळ हरवल्याची तक्रार करण्यावाचून पोलिसांनी अद्याप कोणतेही पाऊल उचलेले नाही. यासंदर्भात प्रकल्पग्रस्त महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री पाटील यांनीही पोलिसांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे पण त्यांच्याही पत्राला पोलिसांनी केराची टोपली दाखवल्याचे दिसून येते.      

Story img Loader