* तक्रार मागे घेण्यासाठी कुटुंबियांना धमक्या
* श्रमिक मुक्ती संघटनेचे पोलिसांविरोधात धरणे
मुरबाड येथील एक महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा अद्याप शोध न लागल्याच्या निषेधार्थ बुधवारी श्रमिक मुक्ती संघटनेने मुरबाड पोलीस ठाण्यासमोर धरणे धरले.
दरम्यान, ‘तक्रार मागे घ्या, अन्यथा मुलीस मारून टाकू’, अशा धमकीचा दूरध्वनी आल्याने मुलीचे कुटुंबीय दहशतीखाली असल्याचे सांगण्यात येते.
मुरबाड येथील एक १६ वर्षीय मुलगी २३ जानेवारीपासून घरातून बेपत्ता आहे. शेजारी राहणाऱ्या एका तरूणाने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी २६ जानेवारी रोजी दिली. मात्र पोलिसांनी त्यानंतर तब्बल आठ दिवसांनी, ४ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात गुन्हा नोंदविला. म्हसा यात्रेच्या बंदोबस्तात कर्मचारी व्यस्त असल्याने यासंदर्भात तपास होऊ न शकल्याचे कारण मुरबाड पोलीस देत आहेत, अशी माहिती श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी दिली.
दरम्यान, ही मुलगी बेपत्ता झाली, त्याच दिवशी तिच्या शेजारी राहणारा मिलिंद नागवंशी हा तरूणही गावातून दिसेनासा झाला. मुलीच्या नातेवाईकांनी पोटगांव या त्याच्या मूळ गावी जाऊन त्याचा शोध घेतला. तिथेही तो नव्हता. त्यामुळे या मुलानेच मुलीस फूस लावून पळवून नेल्याची स्पष्ट फिर्याद नातवाईकांनी पोलिसांकडे केली आहे.
यासंदर्भात मुरबाड पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता ४ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी संशयिताविरूद्ध गुन्हा नोंदवून त्याचा तपास सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.

Story img Loader