लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : विलेपार्ले येथे दोन अल्पवयीन (१४ आणि १७ वर्ष) भावांना चोर समजून स्थानिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. चार ते पाच जणांनी दोघांना विवस्त्र करून केस कापले, त्यानंतर साखळीने बांधून परिसरात धिंड काढून त्याचे चित्रीकरण केले व ती चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसिद्ध केली. यातील आरोपींनी दोन्ही मुलांना रात्रभर बांधून होते. याप्रकरणी जुहू पोलिसांनी सूरज पटवा नावाच्या व्यक्तींसह तीन ते चार जणांविरुद्ध सोमवारी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत.
विलेपार्ले परिसरात ६० वर्षीय तक्रारदार महिला तिच्या दोन नातवांबरोबर राहतात. त्या कचरा वेचण्याचे काम करतात. मुलीचे निधन झाल्यानंतर तिच्या पतीने मुलांची जबाबदारी झटकली. तेव्हापासून दोघेही आजीसोबत राहतात.आजी त्या मुलांचे पालन-पोषण करत आहे. त्यांना एका परिचीत व्यक्तीने समाज माध्यमांवरील चित्रफीत दाखवली. त्यात काही व्यक्ती विवस्त्र करून त्यांच्या नातवांना मारत असल्याचे दिसून आले. हा प्रकार बघून त्या घाबरल्या. त्यांनी परिसरात मुलांचा शोध घेतल्या असता त्यांना मुले सापडली. मुलांना मारहाण झाली होती. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकाराबाबत मुलांना विश्वासात घेऊन विचारले.
आणखी वाचा-आणखी तीन रुग्णालयांमध्ये पोलिसांना वैद्यकीय तपासणी करता येणार
राहुल मेडिकलच्या बाजूला नायडू चाळ येथे सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास गेलो असता तेथे राहणाऱ्या रहिवाशांना दोघेही चोरीसाठी आल्याचा संशय आला. त्यांनी दोघांनाही पकडले व दम दिला. आम्ही गयावया करू लागलो. त्यावेळीही त्यांनी आमचे काहीच ऐकले नाही. चोरीच्या संशयातून आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हात-पाय बांधून आमचे केस कापण्यात आले, तसेच हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आमची परिसरात धिंड काढून बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर रात्रभर बांधून ठेवण्यात आले. तसेच कुणालाही काही सांगितल्यास पुन्हा मारहाण करण्याची धमकी देऊन सकाळी सोडून दिल्याचे नातवाने आजीला सांगितले.
आणखी वाचा-नाहूरमध्ये पक्षीगृहाच्या प्रस्तावाला विरोध, पक्षीगृहाऐवजी अत्यावश्यक सुविधांची मागणी
या घटनेमुळे दोघेही घाबरले होते. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी कुणाला काहीच सांगितले नाही. अखेर आजीने याप्रकरणात परिचित व्यक्तीसोबत पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. तसेच समाज माध्यमांवर वायरल झालेली चित्रफीतही पोलिसांना दाखवण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन याप्रकरणी सोमवारी जुहू पोलिसांनी सूरज पटवासह तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.