मुंबई : जानेवारी महिन्यात अयोध्येत झालेल्या राममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला मीरा रोड येथे उसळलेल्या जातीय हिंसाचाराप्रकरणी अटकेत असलेल्या १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. सर्व कथित आरोपींना कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना प्रामुख्याने स्पष्ट केले.
अयोध्येतील राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्यासाठी निघालेल्या हिंदूच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा याचिकाकर्त्यांचा पूर्वनियोजित कट होता हे पुराव्यांचा विचार करता ठामपणे सांगता येत नाही, घटनेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद चित्रण पाहिल्यानंतर याचिकाकर्त्यांनी तक्रारदार अथवा इतर कोणावरही हल्ला केल्याचे दिसत नाही, असे निरीक्षणही न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने १४ कथित आरोपींना दिलासा देताना नोंदवले. याशिवाय, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून याचिकाकर्ते पळून जाण्याची शक्यता कमी आहे. त्याचप्रमाणे, सर्व याचिकाकर्ते हे जानेवारीपासून कोठडीत आहेत आणि या खटल्याची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे, याचिकाकर्त्यांना आणखी कोठडीत ठेवणे योग्य नसल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले.
े
सर्व याचिकाकर्ते हे गुन्हेगारी वृत्तीचे आणि देशविरोधी कारवाया करणाऱ्या गटाशी संबंधित असल्याचे पुरावे सादर करण्यात फिर्यादी पक्ष अयशस्वी ठरला आहे. मूळात कथित घटना घडली त्या ठिकाणाहून हिंदू ताफा जाणे हा योगायोग होता. त्यामुळे, ताफ्यात सहभागी असलेल्यांवर हल्ला करण्याचा कोणताही पूर्वनियोजित कट असल्याचे मानता येणार नाही, असे सकृतदर्शनी मत न्यायालयाने नोंदवले.
हेही वाचा – ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
प्रकरण काय ?
जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे राममूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मीरा रोड येथे दंगल उसळली होती. पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, आरोपी हे दंगलीतील ५० ते ६० जणांच्या जमावाचा भाग होते. त्यांनी तक्रारदाराला घेराव घातला. तसेच, अयोध्येला निघालेल्या ताफ्याविरोधात घोषणाबाजी करून त्यांना मारहाण केली, असा आरोप याचिकाकर्त्यांवर आहे.