पोलिसांची महिन्यानंतर कारवाई
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी सारा देश ढवळून निघालेला असतांना मुंबईत एका महिलेचा भाजपाच्या पदाधिकाऱ्याने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. मलबार हिल पोलिसांनी या पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. मोहन ऊर्फ पप्पी सैनी असे या भाजपा पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
सैना हा भाजपाच्या मलबार हिल येथील प्रभाग २१४ चा वॉर्ड अध्यक्ष आहे. विशेष म्हणजे, महिलेने एक महिन्यापूर्वी त्याच्या विरोधात तक्रार केली असता पोलिसांनी साधी दखलही घेतली नव्हती.
मलबार हिल परिसरात राहणारी ही महिला मासे विक्रीचा व्यवसाय करते. गेल्या काही दिवसांपासून मोहन उर्फ पप्पी सैनी तिला त्रास देत होता. राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने त्याचा या भागात दबदबा होता. सुरुवातीला या महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु त्याचा त्रास वाढल्याने तिने २९ नोव्हेंबर २०१२ रोजी मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
मात्र पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा (एनसी) नोंदवला. ही २७ वर्षीय महिला मोहन सैनीच्या त्रासाला वैतागली होती. सैनी आपल्याला अश्लील शिविगाळ करायचा तसेच त्याच्यामुळे घरातून बाहेर पडायचीही भीती वाटत होती, असे तिने सांगितले. त्याच्या दहशतीपुढे तिचा पतीही हतबल झाला होता. सैनीने आपल्याकडे शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी केल्याचा आरोपही या फिर्यादी महिलने केला आहे. अखेर पुन्हा धाडस करून तिने शनिवारी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सैनी याला छेडछाडीच्या गुन्ह्याखाली अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटका केली.
सैनीवर गुन्हा दाखल होताच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचा पवित्रा घेतला होता. सायंकाळी भाजपाचे मुंबई अध्यक्ष राज पुरोहीत यांनी त्याला पक्षातून तात्काळ काढून टाकत असल्याचे जाहीर केले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्याच्या बचावाचा प्रश्नच येत नाही. अशी माणसे पक्षात नकोतच, म्हणून त्याची हकालपट्टी करत असल्याचे पुरोहीत यांनी सांगितले.    

Story img Loader