रात्री-अपरात्री धावतपळत स्थानकावर पोहोचायचे.. अगदी पूल उतरताना शेवटची गाडी जाताना बघायची.. अनेक मुंबईकरांसाठी हा प्रकार नवीन नाही. मात्र आता शेवटची गाडी चुकली, तरी चिंता करण्याची गरज नाही. कारण ‘बेस्ट’ प्रशासन दादरपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरांत एक एक बस रात्री उशिरा चालवण्याचा विचार करत आहे.
मध्य रेल्वेवर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून रात्री १२.३८ वाजता शेवटची कर्जत गाडी रवाना होते. तर पश्चिम रेल्वेवर रात्री १ वाजता बोरिवलीला जाणारी शेवटची गाडी निघते. ती चुकली की मग पहिल्या गाडीची वाट पाहत ताटकळावे लागते. या पाश्र्वभूमीवर मध्यरात्रीनंतर दादर स्थानकातून दोन विशेष बसगाडय़ा सोडण्याचा विचार आहे, असे बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता आणि बेस्ट समितीचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांनी सांगितले.
बेस्टची प्रस्तावित सेवा
*दादरपासून दहिसपर्यंत स्वामी विवेकानंद मार्गावरून
*दादरपासून ठाण्यापर्यंत लालबहादूर शास्त्री मार्गावरून.