शहरांचा विकास करताना शास्त्रीय नियोजन केले जात नसल्याने केवळ रोजगार मिळविण्यासाठी ग्रामीण भागातून शहरांकडे येणाऱ्या लोंढय़ांमुळे सुजलेली शहरे तयार होत आहेत. तेथे लाखो लोक झोपडपट्टय़ांमध्ये रहात असून किमान जीवनावश्यक गरजाही योग्यप्रकारे राबविल्या जात नाहीत. शहर आराखडय़ाची दिशाच चुकली असली तरी नागरीकरणाकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन नागरी प्रश्नांबाबत आणि विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या तज्ज्ञांनी एका चर्चासत्रात मंगळवारी केले. ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांच्यातर्फे ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमाअंतर्गत ‘अर्धनागरीकरणाचे आव्हान’ विषयावर दोन दिवसांच्या चर्चासत्रात शहरीकरण म्हणजेच विकास आहे का, शास्त्रीय नगर नियोजन आदीं मुद्दय़ांवर विस्तृत ऊहापोह करण्यात येत आहे.
कोणीही शहरे विचार व नियोजनपूर्वक आणि पायाभूत सुविधा निर्माण करून वसवत नाही. केवळ बेसुमार लोकसंख्यावाढ होत आहे. आरोग्य, शिक्षण, पाणी, स्वच्छतागृहे आदी किमान मानवी गरजाही शहरांमध्ये भागविल्या जात नाहीत आणि शहरांची बेबंदपणे वाढ होत आहे. त्यामुळे केवळ पाश्चात्यांचे अंधानुकरण न करता विभागाच्या भौगोलिक आणि सामाजिक गरजा लक्षात घेवून विकास घडवून आणला पाहिजे, असे मत हेरंब कुलकर्णी, डॉ. विवेक भिडे, विजय दिवाण यांनी व्यक्त केले. नागरीकरण कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे त्यातून येणाऱ्या स्थित्यंतराकडे सकारात्मक दृष्टीने पहायला हवे. नियोजनपूर्वक नागरीकरण झाले,तर देशाचा निश्चित विकास होईल, असे मत ज्येष्ठ उद्योगपती पी.पी. पुणतांबेकर, ललितकुमार जैन, अजित जोशी यांनी व्यक्त केले. शहरीकरणाच्या नादात आपण ‘अवकाश’ आणि माणूसपण गमावून बसत चाललो आहोत. मानसिक, बौध्दिक, वैचारिक आक्रमण आपल्यावर होत असून संवेदना नष्ट होत आहेत, असे मत ‘अर्धनागरीकरणाची संस्कृती काय?’ विषयावर बोलताना नाटय़ दिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केले. नागरीकरण अपरिहार्य असल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
सुजाण नागरिकांनी आपला दबावगट निर्माण केला पाहिजे आणि धोरण आखताना कृतीशील असले पाहिजे, असे गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले. ‘नागरीकरणाची बाजारपेठ’ विषयावरील चर्चासत्रात बोलताना अजित जोशी आणि वैजयंती पंडित यांनीही आपली मते यावेळी व्यक्त केली.
शहर नियोजनाची दिशा चुकली
शहरांचा विकास करताना शास्त्रीय नियोजन केले जात नसल्याने केवळ रोजगार मिळविण्यासाठी ग्रामीण भागातून शहरांकडे येणाऱ्या लोंढय़ांमुळे सुजलेली शहरे तयार होत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-10-2013 at 03:47 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Miss the city development planning