अभिनेता सलमान खान याच्याविरोधातील ‘हिट अॅंड रन’ खटल्याची सुनावणी पुन्हा एकदा २४ सप्टेंबरपासून वेग घेण्याची शक्यता आहे. या खटल्याशी संबंधित साक्षीदाराचे जबाब पोलीसांकडून गहाळ झाल्यामुळे सुनावणीमध्ये अडथळा आला होता. मात्र, अखेर एकूण ६३ पैकी ६२ साक्षीदारांच्या जबाबाची कागदपत्रे शोधून काढण्यात पोलीसांना यश आले असून, ही सर्व कागदपत्रे न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.
केवळ एक जबाबाची कागदपत्रे वगळता इतर सर्व पोलीसांना सापडले असून, हे सर्व न्या. डी. डब्ल्यू. देशपांडे यांच्यापुढे ठेवण्यात आले असल्याचे सरकारी वकिलांनी शुक्रवारी न्यायालयात सांगितले. जो एक दस्तावेज अद्याप हरवलेला आहे, तो ही लवकरच सापडेल आणि तो न्यायालयाकडे देण्यात येईल, असेही सांगण्यात आले. गेल्या जुलैमध्ये सरकारी वकिलांनी साक्षीदारांच्या जबाबाची कागदपत्रे गहाळ झाली असल्याचे न्यायालयात सांगितले. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात खटल्याशी संबंधित केस डायरीही मिळत नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायाधीशांनी गहाळ झालेली कागदपत्रे आणि केस डायरी तातडीने शोधण्याचे आदेश पोलीसांना दिले. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी या प्रकरणी तपासाचे आदेश दिल्यानंतर २६ ऑगस्टला वांद्रे पोलीस ठाण्यात सर्व कागदपत्रे सापडली होती.

Story img Loader