मुंबई : मुंबई महानगरपालिकेने चांदिवली येथील ६० फुटी विजय फायर मार्ग आणि जंगलेश्वर मंदिर मार्ग (खैरानी रस्ता) यादरम्यानच्या ‘मिसिंग लिंक’ जोडणी प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पात अडथळा बनलेली आनंदीबाई सुर्वे उद्यानाजवळील पाच बांधकामे महापालिकेने गुरुवारी हटविली. त्यामुळे ‘मिसिंग लिंक’च्या जोडणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
चांदिवली परिसरातील ६० पुटी विजय फायर मार्ग आणि जंगलेश्वर मंदिर मार्गादरम्यानच्या ‘मिसिंग लिंक’ जोडणी प्रकल्पाचे काम सुरू आहे. येथील आनंदीबाई सुर्वे उद्यानाजवळील पाच बांधकामे या प्रकल्पास अडथळा बनली होती. महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाने संबंधितांना नोटीस देऊन, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही बांधकामे गुरुवारी हटविली. त्यामुळे ‘मिसिंग लिंक’ जोडणीचा मार्ग मोकळा झाला असून रस्ते विभाग तात्काळ येथील रस्ते विकासाचे काम हाती घेणार आहे. उप आयुक्त (परिमंडळ-५) देविदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली निष्कासनाची ही कार्यवाही करण्यातआली.
चांदिवली परिसर व असल्फा – घाटकोपर यांना थेट जोडणारा रस्ता सध्या अस्तित्वात नाही. चांदिवलीमधील नागरिकांना साकीनाका जंक्शनला वळसा घालून घाटकोपरकडे जावे लागते. तसेच, नहार ले आउटमधील खैरानी मार्गास जोडणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने तेथे मोठी वाहतूक कोंडी होते. या पार्श्वभूमीवर ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.