सिरिया आणि इराकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या इसिस या अतिरेकी संघटनेत सामील होण्यासाठी घरातल्यांना न सांगता इराकमध्ये गेलेल्या कल्याणमधील चार तरुण अतिरेक्यांपैकी अरिफ फय्याझ मजीद चकमकीत ठार झाल्याचे वृत्त आहे. अरिफबरोबरच पळून गेलेल्या शाहीन फारुकी टांकी याने दूरध्वनी करून अरिफच्या मृत्यूची माहिती दिल्याचे या चौघांच्या नातेवाईकांनी सांगितले. मात्र या माहितीस भारत अथवा इराकमधील कोणत्याही अधिकृत संस्थेकडून दुजोरा मिळालेला नाही.
अरिफ मजीद व शाहीन टांकी यांच्यासह  आणि अमन नईम तांडेल हे चौघे मे महिन्यात घरच्यांना न सांगता प्रथम बगदादला व तेथून फलुजा या इसिसचा बालेकिल्ला असलेल्या शहरात पळून गेले होते. मंगळवारी रात्री शाहीन टांकी याने दूरध्वनी करून अरिफ एका चकमकीत मृत्युमुखी पडल्याचे कळवले, अशी माहिती फहादचे काका इफ्तिकार खान यांनी दिली. मात्र अरिफच्या मृत्यूबाबत शाहीनकडे अधिक काहीही माहिती नव्हती, असेही इफ्तिकार यांनी सांगितले.
हे चौघेही तरुण कल्याणमधील दूधनाका- गोविंदवाडी परिसरात राहात होते. गेल्या २३ मे रोजी ते इराकमधील तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी जाणाऱ्या एका गटाबरोबर बगदादला गेले. २४ मे रोजी अरिफने तेथून आपल्या घरी दूरध्वनी केला होता. आपण नोकरी शोधण्यासाठी येथे आल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही त्याने घरी संपर्क साधला होता. मात्र त्याच दिवशी हे चौघेही फलुजा येथे गेले आणि तेव्हापासून अरिफचा दूरध्वनीही बंद झाल्याचे इराकी तपास यंत्रणांच्या तपासात निष्पन्न झाले होते.
या चौघांना कुणी तरी अतिरेकी धर्मभावनेने प्रेरित केले होते. त्याच्यावर कारवाई करावी, अशी विनंती या चौघांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची दिल्लीत भेट घेऊन केली होती.
मजीद आप्तांच्या वागण्यावर अतिशय नाराज होता. धूम्रपान करणे, टीव्ही पाहणे, पुरुष आणि महिलांनी एकत्र वावरणे, विवाहबाह्य़ संबंध, अल्लाची प्रार्थना न करणे, दाढी न वाढवणे आदी प्रकारांनी तुम्ही नरकात जाल, अशी भावना त्याने आपल्या पत्रात व्यक्त केली होती.
इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (इसीस) या संघटनेने  महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर या राज्यांतील गरीब तरुणांना चिथवून इराकमध्ये नेण्यासाठी जाळे विणले आहे.

Story img Loader