डास निर्मूलनासाठी विविध उपाय योजून थकलेल्या महापालिकेने आता मुंबईत ठिकठिकाणी ‘नासा’च्या तांत्रिक साह्याने तयार केलेली ‘मॉस्क्युटो किलिंग सिस्टम मशीन’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या मशीनच्या देखभालीबाबत भुणभुण करीत स्थायी समिती सदस्यांनी त्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला.
मुंबई डासमुक्त करण्यासाठी धूम्र फवारणी, कीटकनाशकांची फवारणी करण्यात येते. परंतु  त्याचा डासांवर फारसा परिणाम होत नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे आता प्रायोगिक तत्वावर ‘मॉस्क्युटो किलिंग सिस्टम मशीन’ बसविण्यात येणार आहे.
‘ड्रीम इनोव्हेटिव्ह सप्लायर्स कंपनी’कडून ही यंत्रे खरेदी करण्यात येणार असून त्याची किंमत प्रत्येकी १ लाख २५ हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.
महापालिकेच्या सात विभागांमध्ये प्रत्येकी एक यंत्र बसविण्यात येणार आहे. या यंत्रांसाठी राष्ट्रीय हिवताप संशोधन संस्थेने शिफारस केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी स्थायी समितीमध्ये दिली. हे यंत्र डासांना आकर्षित करून त्यांचा नायनाट करते. त्याच्या देखभालीची जबाबदारी पुरवठादार कंपनीवरच टाकण्यात आली आहे.
असे आहे यंत्र
टपालपेटीसदृश या यंत्रात कार्बनडायऑक्साईडचा सिलिंडर आणि एक पंखा आहे. मशीन सुरू होताच पंखा फिरू लागतो आणि कार्बनडायऑक्साईड हवेत पसरू लागतो. त्याच्या गंधाने डास मशीनकडे आकर्षित होतात आणि त्यातील इलेक्ट्रिक सर्किटमुळे त्यांचा नायनाट होतो. डासांचा मोठय़ा संख्येने वावर असलेल्या ठिकाण हे मशीन उभे केल्यास साधारण एक एकर जागेतील डासांचा नायनाट होऊ शकेल, असा पालिका अधिकाऱ्यांचा दावा आहे.

Story img Loader