मुंबई : दहावीच्या मार्च २०२४ च्या परीक्षेत मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागावा याकरीता शिक्षण विभागाने यंदा विशेष मेहनत घेतली आहे. मिशन मेरीट ही संकल्पना राबवून एकही विद्यार्थी मागे राहणार नाही याकरीता दहा सराव परीक्षा घेण्यात आल्या असून अधिकाऱ्यांनी एकेक शाळा दत्तक घेऊन प्रगतीचा पाठपुरावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगरपालिकेच्या एकूण २४९ माध्यमिक शाळा मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये आहेत. पालिकेच्या शाळांतील सुमारे १७ ते १८ हजार विद्यार्थी दरवर्षी दहावीच्या परीक्षेला बसतात. या शाळांचा मार्च २०२३ चा दहावीचा निकाल आधीच्या वर्षापेक्षा वाईट लागला होता. मार्च २०२२ मध्ये ९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर मार्च २०२३ मध्ये ८७ टक्के निकाल लागला. त्यामुळे पालिकेच्या शिक्षण विभागाने येत्या मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेचा निकाल चांगला लागावा यासाठी वर्षाच्या सुरुवातीपासूनच शाळांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा कमी निकाल लागलेल्या ८८ शाळांच्या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाने नोटीसही पाठवली होती. तसेच मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षेचा निकाल वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली असून प्रत्येक विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत यश मिळावे, यासाठी अत्यंत सोप्या व मोजक्या आशयाच्या ‘मिशन-३५’ पुस्तिका विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्या आहेत. त्यामुळे यंदा दहावीचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागेल असे उद्दिष्ट्य ठेवण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.

हेही वाचा – मुंबई : स्वच्छता मोहिमेसाठी महापालिका आयुक्त रस्त्यावर, अरुंद वसाहतींमध्ये जाऊन केली स्वच्छता

हेही वाचा – पनवेल – कर्जत रेल्वे मार्गातील बोगद्याचे दोन किमी खोदकाम पूर्ण

विद्यार्थ्यांना अधिक सराव व्हावा यासाठी डिसेंबरपासून बोर्डाच्या धर्तीवर शालेय स्तरावर सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या होत्या. याशिवाय अधिकाऱ्यांना शाळा दत्तक देऊन मार्गदर्शन करण्यात आले होते. या अधिकाऱ्यांनी दर महिन्याला संबंधित शाळेत जाऊन प्रगतीचा आढावा घ्यावा, कोणी विद्यार्थी अभ्यासात मागे आहे का, त्याच्या प्रगतीसाठी काय करता येईल, यावर उपाययोजना करावी अशा पद्धतीचा मेरीट पॅटर्न राबवण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mission merit in mumbai mnc school for better 10 th result mumbai print news ssb
Show comments