लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: मुंबई विद्यापीठाने विधी शाखेतील तृतीय वर्ष सहाव्या सत्राची परीक्षा (तीन वर्षीय अभ्यासक्रम) ही ३ ते २४ मे २०२३ या कालावधीत घेतली होती. परंतु ८ मे रोजी झालेल्या ‘पुरावा कायदा’ (लॉ ऑफ एव्हिडन्स) या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत भाषांतराच्या तसेच व्याकरणाच्या चुका आढळल्या आहेत. यामुळे संभाव्य गुणांचे नुकसान टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सिद्धयोग विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शुक्रवार, ३ जून रोजी थेट विद्यापीठाच्या सांताक्रुझ येथील कलिना संकुलातील परीक्षा विभाग गाठले. यावेळी एक पत्र सादर करीत विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्याची त्यांनी परीक्षा नियंत्रकांकडे मागणी केली.

विद्यार्थ्यांना ‘पुरावा कायदा’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक ३ मध्ये ४ पैकी २ प्रश्न सोडवायचे असतात. परंतु ८ मे रोजी झालेल्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेत ३ प्रश्न देण्यात आले. यापैकी मराठी भाषेतील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक ३-क मध्ये भाषांतराच्या तसेच व्याकरणाच्या चुका होत्या. सदर प्रश्न हा सहा गुणांचा असल्यामुळे याचा निकालावर मोठा परिणाम होण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे. ‘प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये बदल करता येत नाही. प्रश्नपत्रिकेचे मराठी भाषांतर हे व्याकरणानुसार अचूक व्हावे, असा नियम आहे. त्यातच ४ ऐवजी ३ पर्याय दिल्यामुळे ६ गुणांचा फटका हा मराठीसह इंग्रजी भाषेत उत्तरपत्रिका सॊडविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसणार आहे’, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.

हेही वाचा… म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३: अखेर मध्यम गटातील दादरमधील एक घर सोडतीतून वगळले

‘विधी शाखेतील तृतीय वर्ष सहाव्या सत्राच्या ‘लॉ ऑफ इव्हिडन्स’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत मराठी भाषांतराच्या चुका आहेत, अशी एक तक्रार प्राप्त झाली आहे. संबंधित शिक्षकांकडे याबाबत विचारणा केली जाईल. संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल’, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mistakes in translation and grammar have been found in question paper of the subject law of evidence mumbai print news dvr