डिस्कव्हरी किड्स या बच्चेकंपनीसाठीच्या वाहिनीवर कार्टून मालिका आणि व्हिडिओ गेम्स, गोष्टीरूप कार्यक्रमांना संपूर्णपणे वगळून अनोख्या पद्धतीचा मुलांना माहितीपर मनोरंजन पर्यटन असा एकत्रित अनुभव देणारा ‘मिस्ट्री हंटर्स इंडिया’ हा कार्यक्रम सुरू होणार आहे. अनेक हिंदी चित्रपट, जाहिरातींमध्ये झळकलेले अपूर्वा अरोरा आणि हिमांशू शर्मा हे बालकलाकार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. शाळकरी मुलांना गूढ गोष्टींचे आकर्षण असते, गूढाची उकल करण्याची ओढ असते हे ध्यानात घेऊन कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. २२ डिसेंबरपासून दररोज सायंकाळी ६ वाजता दाखविण्यात येणाऱ्या या मालिकेत पुण्यातील शनिवारवाडय़ाला भेट देऊन या बालकलाकारांनी शनिवारवाडा, पेशव्यांचा इतिहास जाणून घेतला असून तो कार्यक्रमातून दाखविला जाणार आहे. अशाच प्रकारे अहमदाबाद, राजस्थानातील अनेक ठिकाणे, गुजरातमधील रायोली, केरळ, तामिळनाडू, दिल्ली, मुंबई इत्यादी ठिकाणी जाऊन ऐतिहासीक वास्तु, घटना यांचे रहस्य कार्यक्रमांतून मांडले जाणार आहे. अकरावीत शिकणारी अपूर्वा अरोरा आणि सातवीत शिकणारा हिमांशू शर्मा या दोघांनी जवळपास ५० ठिकाणांना भेटी देऊन कार्यक्रम सादर केला आहे. नैसर्गिक आश्चर्ये, घनदाट जंगले, पुरातत्व विभागाने जतन केलेल्या ऐतिहासीक वास्तु यांचे रहस्य यातून मांडले जाणार आहे. डिस्कव्हरी किड्स वाहिनीने भारतात निर्मिती केलेला हा पहिलाच कार्यक्रम आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा