पत्नी समजून दुसऱ्याच तरुणीवर हल्ला करणाऱ्या विजय सांगलेकर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सोमवारी तो पत्नी वैशालीवर हल्ला करण्यासाठी दादर स्थानकात थांबला होता. पण वैशाली त्याला भेटायला येणारच नव्हती. तिने केवळ त्याला भेटायला येण्याचे आश्वासन दिले होते, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हल्ल्याच्या वेळी ती शीव येथील आपल्या कार्यालयातच होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सोमवारी सकाळी दादरच्या स्वामी नारायण मंदिराजवळ सोनल लपाशिया या तरुणीवर विजय सांगलेकर याने कोयत्याने हल्ला केला होता. पत्नी समजून त्याने चुकून सोनलवर हल्ला केला. विजयने रविवारीच वैशालीला मारण्याची योजना बनविली होती. रविवारी तो वैशालीला भेटण्यासाठी नालासोपारा येथे गेला होता. वैशाली मुलगा प्रेम याला घेऊन त्याला भेटायला आली तेव्हा तिने गुलाबी शर्ट, जिन्स पँट आणि चेहऱ्यावर स्कार्फ लावलेला होता. परंतु प्रेमला पाहून त्याने आपला विचार बदलला. त्याने सोमवारी पुन्हा तिला भेटायला बोलावले. वास्तविक वैशाली विजयला टाळत होती. परंतु विजय तिला भेटायाचा आग्रह करत होता. त्यामुळे विजयने पुन्हा वैशालीला सोमवारी दादरला बोलावले तेव्हा तिने केवळ तोंडदेखले आश्वासन दिले होते. ती सोमवारी नेहमीप्रमाणे नालासोपाऱ्याहून दादरला आणि तेथून आपल्या शीवच्या कार्यालयात गेली होती. परंतु वैशाली भेटायला येईल आणि आपण तिच्यावर हल्ला करू, अशा भ्रमात विजय होता.
वैशालीची वाट बघत असतांना सोनल लापशिया ही तरुणीही योगायोगाने शर्ट, जीन्स पँट आणि स्कार्फ घालून जात होती. त्यामुळे सोनल हीच वैशाली आहे असा त्याचा समज झाला आणि त्याने हल्ला केला, अशी माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश परब यांनी दिली.
मुंबईत वैशाली मॉर्डन झाली.
वैशालीचे २००७ मध्ये विजय सांगलेकरशी लग्न झाले. केवळ ७-८ महिनेच ते एकत्र होते. सततच्या वादांना कंटाळून वैशाली आईला घेऊन नालासोपारा येथे आली. ती बारावी झालेली होती. येथेच तिने अर्धवेळ काम करत पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शीव येथे चांगल्या पगारावर एका सुरक्षा कंपनीत ती कामाला लागली. तिला दरमहा २० हजार पगार होता. शहरी वातावरणात तिचे रूप बदलले. तिचा पेहराव जीन्स, टी शर्ट असा झाला. विजयने तिला दरमहा पोटगीचे ५०० रुपये आणि मुलाच्या पालनपोषणाचे १२०० रुपये द्यावेत, असे न्यायालयाचे आदेश होते. परंतु विजयने ते पैसै दिले नव्हते. या रकमेची त्याच्याकडे तब्बल ५० हजार रुपयांची थकबाकी झालेली होती. मी तीन महिन्यांपूर्वी विजयला सुधारण्याची संधी दिली होती. त्याला नालासोपाऱ्याच्या घरीसुद्धा आणले होते. परंतु तो सुधारला नाही. माझ्या आईशीही त्याने भांडण केले, असे वैशालीने पोलिसांना सांगितले. आपल्या पतीने एका तरुणीवर हल्ला केला, ही माहिती आपल्याला टीव्हीच्या बातम्या पाहून समजली, असे तिने पोलिसांना सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा