मिठी नदीला कुर्ला परिसरात एक दुसरा फाटा फुटायचा आणि तो नंतर पूर्वेच्या दिशेने जाऊन माहूलच्या खाडीला मिळायचा. मात्र आता तो दुसरा मार्ग सांताक्रूझ विमानतळाच्या धावपट्टीच्या कुर्ला येथील टोकापासून ते नौसेना विहार मार्गापर्यंतचा पट्टा हा शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये बुजविण्यात आला आहे. हा मार्ग मोकळा राहिला असता तर कालिना ते वांद्रे या परिसरामध्ये २००५ साली २६ जुलैच्या पुरामध्ये झालेली मोठी वित्त आणि मनुष्यहानी आपल्याला टाळता आली असती.

ज्वालामुखीतून उफाळून आलेल्या लाव्हारसातून तयार झालेल्या अनेक लहानमोठय़ा डोंगररांगा मुंबईत पाहायला मिळतात. यातील पहिली रांग ठाण्यापासून घाटकोपपर्यंत येते. खरे तर ही रांग कुर्ला-चुनाभट्टीपर्यंत होती. याला कामण डोंगररांग असेही म्हणतात. कारण तुंगारेश्वरजवळील कामणपासून ही डोंगररांग थेट पाहायला मिळते. सध्याच्या भाईंदर-ठाणे घोडबंदर मार्गाला समांतर वाहणाऱ्या वसईच्या खाडीने मात्र या डोंगररांगेचे नागला बंदरजवळ दोन भाग केलेले दिसतात. यातील उत्तर मुंबईचा भाईंदर ते गोरेगाव किंवा घाटकोपर हा तुकडा, सध्याच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रामध्ये येतो. मुंबईमध्ये मुलुंडपासून या डोंगररांगेला समांतर असा मध्य रेल्वेमार्ग ब्रिटिशांनी बांधलेला दिसतो.

या कामण डोंगररांगेच्या खालच्या बाजूस पश्चिमेस एक छोटेखानी डोंगररांग कान्हेरीच्या परिसरात पाहायला मिळते. कान्हेरीच्या ज्वालामुखीतून बाहेर आलेला लाव्हा व राख ही थेट साकीनाक्यापर्यंत पसरलेली होती. त्या चिखलमिश्रित राखेचे (टूफ) अवशेष आजही अंधेरी, साकिनाका, विहार तलाव व मरोळ परिसरात पाहायला मिळतात, अशी माहिती भूगर्भतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास विळदकर देतात.

कान्हेरीपासून सुरू होणारी ही डोंगररांग तुळशी, विहार आणि पवई या तीन तलावांना आपल्या कुशीत घेते; किंबहुना या तीन तलावांचे अस्तित्व या डोंगररांगावरच अवलंबून आहे. म्हणून या डोंगररांगांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या डोंगररांगांमुळेच मुंबईमध्ये तीन ठिकाणी खोलगट भाग तयार झाले आणि तिथे पाण्याचे स्रोत निर्माण झाले. या तीन ठिकाणी सध्या अनुक्रमे तुळशी, विहार आणि पवई तलाव अस्तित्वात आहेत.   विद्यमान तुळशी तलावाच्या वरच्या बाजूस दहिसर नदीचा मूळ स्रोत आहे. तुळशीच्या इथून निघाल्यानंतर कान्हेरी लेणींमधून ही नदी खालच्या बाजूस उतरते आणि नंतर बोरिवली-दहिसर असे करत अरबी समुद्राला मिळते. अशाच पोईसर आणि ओशिवरा याही दोन महत्त्वाच्या नद्या मुंबईच्या पटलावर पाहायला मिळतात. यातील पोईसर नदी ही कांदिवली पूर्वेस राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगररांगामध्ये उगम पावते आणि ठाकूर संकुलाजवळ द्रुतगती महामार्गाखालून पश्चिमेस मालाडच्या खाडीला जाऊन मिळते, तर ओशिवरा नदी ही गोरेगावच्या डोंगररांगांमध्ये उगम पावते आणि आरेमधून वाहत गोरेगाव पश्चिमेस अरबी समुद्राला मिळते.

सध्या आपण मिठी नदी म्हणून ओळखतो तिचे मूळ नाव माहीम नदी. १९२८ साली मुंबईचा भूशास्त्रीय आराखडा अंतिम करण्यात आला, त्यावर तिचा उल्लेख माहीम नदी असाच आहे, याकडे भूगर्भतज्ज्ञ डॉ. रोहिंग्टन आवासिया लक्ष वेधतात. पूर्वी विहार तलावाच्या जागी असलेल्या छोटेखानी तलावामधून तुलनेने लहान आकाराचा पाण्याचा स्रोत बाहेर पडायचा, तेच माहीम नदीचे जन्मस्थान म्हणजेच उगम होय. मरोळ परिसरातून पुढे जाऊन कालिना (तत्कालीन कोळी कल्याण) परिसरात तो माहीमच्या खाडीला येऊन मिळायचा म्हणून त्या पाण्याच्या स्रोताचा उल्लेख माहीम नदी असाच केलेला आढळतो, तर कुर्ला परिसरात या नदीला एक दुसरा फाटा फुटायचा आणि तो नंतर पूर्वेच्या दिशेने जाऊन माहूलच्या खाडीला मिळायचा. मात्र आता तो दुसरा मार्ग सांताक्रूझ विमानतळाच्या धावपट्टीच्या कुर्ला येथील टोकापासून ते नौसेना विहार मार्गापर्यंतचा पट्टा हा शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये बुजविण्यात आला आहे. हा मार्ग मोकळा राहिला असता तर कालिना ते वांद्रे या परिसरामध्ये २००५ साली २६ जुलैच्या पुरामध्ये झालेली मोठी वित्त आणि मनुष्यहानी आपल्याला टाळता आली असती. या परिसराला पुराचा सर्वाधिक फटका बसला, कारण हा परिसर आता मिठीच्या पात्रामध्येच उभा आहे. या वळणावर मिठीचे पात्र सर्वाधिक मोठे होते.

वाढत्या शहरीकरणानंतर मुंबईच्या पाणीपुरवठय़ासाठी १६२ वर्षांपूर्वी म्हणजेच १८५६ साली विहार तलावाचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर वाढवून तो बांधून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तिथे असलेली सात गावे उठवून क्षेत्र वाढविण्यात आले. त्या वेळेस माहीम नदीच्या प्रवाहामध्ये मोठा बदल होऊन तिच्या प्रवाहाचे पात्र सर्वत्र विस्तारले. मात्र नंतर पुन्हा एकदा २० व्या शतकामध्ये शहरीकरणाच्या अनियंत्रित प्रक्रियेमध्ये ते आक्रसत गेले. याच काळात तिला मिठी हे नावही प्राप्त झाले आणि हा नाला नव्हे तर नदी आहे, याचा साक्षात्कार २००५ साली आलेल्या महापुरानंतर मुंबईकरांना झाला. जिथे तिचा माहूल प्रवाह बुजविला गेला तिथपासून पुढे तिने महापुरामध्ये सर्वाधिक वाताहत घडवली, हा आपला अनुभव आहे. मुंबईचे भूरचनाशास्त्र समजून घेतले असते तर ही वाताहात टाळता आली असती!

तुळशीचा शून्य धूप परिसर

पावसाचे पाणी थेट जमिनीवर पडले की जमिनीवरील मातीचा थर त्या पाण्यासोबत वाहून जातो त्याला आपण जमिनीची धूप होणे म्हणतो. तुळशी तलावाचा परिसर हा शून्य धूप असलेला जगातील एक अतिमहत्त्वाचा परिसर आहे, म्हणून त्याचे संरक्षण आणि संवर्धन महत्त्वाचे ठरते. मोठे वृक्ष, लहान वृक्ष, लहान झाडे, छोटी झुडपे आणि मग जमिनीलगत वाढणाऱ्या वनस्पती

अशी उत्तम जंगलाची पाच हिरवाईची आवरणे गणली जातात. ही पाचही ज्या ठिकाणी असतात ते उत्तम जंगल मानले जाते. तुळशीच्या परिसरात असे उत्तम जंगल पाहायला मिळते. १५ मेच्या कडाक्याच्या उन्हातही हा परिसर म्हणूनच सदाहरित असतो!

विनायक परब vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab

 

Story img Loader