लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) येथे मिठी नदी काठी मनोरंजन केंद्र आणि क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बाधा – वापर – हस्तांतरित करा’ तत्त्वावर मनोरंजन केंद्र आणि क्रीडा संकुलाची उभारणी करण्यासाठी एमएमआरडीएने स्वारस्य निविदा मागविल्या आहेत. या प्रकल्पात दोन हॅलिपॅडही बांधण्यात येणार असून त्याचा हवाई रुग्णवाहिक तळ म्हणूनही वापर करण्याचा विचार आहे.
बीकेसीतील जी ब्लॉकमध्ये मिठी नदीलगत आर. जी. २३ अ आणि आर. जी. २३ ब येथे ८.३७ हेक्टर आणि आर. जी. ६ येथे २.४७ हेक्टर अशी एकूण १०.८४ हेक्टर जागा आहे. ही जागा मनोरंजन केंद्रासाठी आरक्षित आहे. एमएमआरडीएने या जागेवर मनोरंजन केंद्र आणि क्रीडा संकुल उभरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला प्राधिकरणाच्या १५४ व्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मंजुरी मिळताच एमएमआरडीएने बुधवारी या प्रकल्पाच्या उभारणीसाठी स्वारस्य निविदा मागविल्या आहेत. ‘बांधा – वापर – हस्तांतरित करा’ तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
आणखी वाचा- मुंबई उपनगरांत उष्माघाताचा ताप, रुग्णसंख्येत दुपटीने वाढ
मनोरंजन केंद्र आणि क्रीडा संकुलातून मिळणाऱ्या महसुलातील सर्वाधिक हिस्सा एमएमआरडीएला देणाऱ्या निविदाकाराला हे काम देण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेअंती नियुक्त होणाऱ्या कंपनीला मनोरंजन केंद्र आणि क्रीडा संकुलासाठी ही जागा ३० वर्षांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. इच्छुकांना १७ जूनपर्यंत स्वारस्य निविदा सादर करता येणार आहेत.
जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून एमएमआरडीए बीकेसीचा विकास करीत आहे. आजघडीला बीकेसीत मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय कंपन्या, राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय बँकांची कार्यालये, शाळा, रुग्णालय, खासगी – सरकारी कार्यालये आहेत. बीकेसीच्या आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी वस्त्या आहेत. बीकेसीत कामानिमित्त येणाऱ्यांना आणि अजूबाजूच्या नागरिकांना मनोरंजनाच्या सोयी – सुविधा उपलब्ध व्हाव्यात, विविध खेळ खेळता यावेत, मुलांना क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने एमएमआरडीएने हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे या प्रकल्पात खेळाचे मैदान आणि विविध खेळाच्या सुविधा, सभागृह, बगिचा अशा अनेक सोयी-सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. याशिवाय मनोरंजन केंद्र आणि क्रीडा संकुलाच्या इमारतीच्या गच्चीवर दोन हेलिपॅडही बांधण्यात येणार आहेत. तसेच हवाई रुग्णवाहिक तळ म्हणूनही या हॅलिपॅडचा वापर करण्यात येणार आहे.