मुंबई : आमदार आणि बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या मोटारगाडीला बेस्टच्या बसने धडक दिली. दादर परिसरातील काकासाहेब गाडगीळ मार्गावरील खेडगल्ली येथे शनिवारी हा अपघात झाला. शिंदे यांच्या मोटारीचे मोठे नुकसान झाले. बेस्ट उपक्रमाने दिलेल्या माहितीनुसार, मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्युशन लिमिटेड या कंत्राटदाराची बस मार्ग क्रमांक १५१ बस वडाळा आगारहून जे. मेहता मार्ग येथे शनिवारी जात होती.
बस दुपारी १२.१५ वाजता काकासाहेब गाडगीळ मार्गावरील खेडगल्ली येथे पोहोचली. तेथे सुनील शिंदे यांची मोटार उभी होती. बेस्ट बसने शिंदे यांच्या मोटारीला समोरून धडक दिली. त्यात मोटारीचे नुकसान झाले. या अपघात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी दादर पोलिसांनी घटनेची नोंद केली.