लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याच्या गृह विभागाने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा नुकताच आढावा घेत माजी मंत्री व आमदारांच्या सुरक्षेत कपातीचा निर्णय घेतला आहे. मात्र यावरून आमदारांमध्ये तीव्र नापसंती असून निर्णयाचा सर्वाधिक फटका शिवसेनेच्या (शिंदे) आमदारांना बसला आहे. त्यामुळे शिंदे गटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची नाराजी वाढली आहे.

जून २०२२मध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा मोठा गट फुटून पक्षाबाहेर पडला. त्यांच्या जिवाला धोका असल्याचे सांगत शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर फुटीर आमदारांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत हाच दर्जा कायम राहिला. मात्र अलीकडेच पोलिसांच्या विशेष संरक्षण विभागाने आढावा घेऊन आमदारांना ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्वपक्षीय आमदारांसाठी असून भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार सुरेश खाडे, राष्ट्रवादीचे प्रतापराव चिखलीकर यांनाही याचा फटका बसला असला तरी शिंदे गटाच्या सर्वाधिक २० आमदारांची सुरक्षा घटविण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटात आपल्याच सरकारविषयी नाराजी आणखी वाढली आहे. शिंदे सरकारच्या काळात आरोग्यमंत्री असलेल्या तानाजी सावंत यांच्यासाठी ४८ सुरक्षारक्षक तैनात होते. आता त्यांना केवळ एक सुरक्षारक्षक मिळेल. त्यामुळे त्यांचा सुरक्षेचा बडेजाव संपुष्टात आला आहे. शिंदे गटाचे काही माजी मंत्री अजूनही सरकारी वाहने आणि पोलीस बंदोबस्तात फिरत आहेत. त्यांनाही आता फटका बसणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा आहे. ३३ मंत्री आणि ६ राज्यमंत्री यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्थेत बदल केलेला नाही. शिंदे यांनी नाराज आमदारांना मार्ग काढण्याचे आश्वासन दिले असतानाच ‘महायुती सध्या व्हॅलेंटाइन साजरा करत आहे’ अशा शब्दांत शिवसेनेच्या (ठाकरे) राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी चिमटा काढला.

महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला धोबीपछाड देण्यास सुरुवात आहे. एस. टी. मंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन सचिवांची नियुक्ती करून कुरघोडी केली. त्यापाठोपाठ उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी खात्याच्या निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जात नसल्याचा सूर लावला. यावरून शिवसेनेत नाराजी आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात एकनाथ शिंदे यांना आधी स्थान देण्यात आले नव्हते. तसेच शिंदे यांचे महत्त्व जाणीवपूर्वक कमी करण्यात येत असल्याची पक्षाच्या आमदारांची भावना झाली आहे. त्यातच आता आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे.

फरक काय?

● ‘वाय’ दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत तीन शस्त्रधारी सुरक्षारक्षक चोवीस तास तैनात असत. बरोबर पोलीस वाहन आणि निवासस्थानाला सुरक्षा असते.

● ‘एक्स’ दर्जामध्ये मात्र केवळ एक शस्त्रधारी सुरक्षारक्षक असतो.

Story img Loader