मुंब्रा येथील रशीद कम्पाऊंडचा परिसर.. संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.. संशयितांना ताब्यात घेताच जमाव संतप्त होतो.. जमावासमोरच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व आमदार जितेंद्र आव्हाड यांचा तोंडाचा पट्टा सुरू होतो.. शिवसेनेचे सुपारीबाज, हप्तेखोर अशा शिविगाळीबरोबरच दहा मिनिटांत सुपारी उघड करतो अशी धमकावणी देणाऱ्या आव्हाड यांची चित्रफीत सध्या यू टय़ूबवर फिरते आहे. त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत आव्हाड अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
रशीद कम्पाऊंडमध्ये काही गुन्हेगार लपले असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त अमित काळे यांनी त्या ठिकाणी फौजफाटा घेऊन कोम्बिंग ऑपरेशन केले. त्यात काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, कारवाईनंतर स्थानिक नेत्यांनी आक्रमक रुप धारण केले. त्यामुळे जमावापुढे नमते घेत पोलिसांना संशयितांची सुटका करावी लागली. परंतु या कारवाईत स्थानिक निरपराध नागरिकांना त्रास दिल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी जमावासमोरच पोलिसांवर आगपाखड केली. त्याची चित्रफीत यू टय़ूबवर दाखवण्यात येत आहे. मुंब्रामध्ये कोम्बिंग ऑॅपरेशन करताना पोलिसांनी अल्पसंख्याक समाजातील सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिल्याच्या आरोपांमुळे सहाय्यक पोलीस आयुक्त अमित काळे यांना यापूर्वीच सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. मात्र, त्याचवेळी पोलिसांना ‘शिवसेनेचे सुपारीबाज’, ‘हप्तेखोर’ अशी जाहीर दमबाजी करणाऱ्या आव्हाडांवर कारवाईचे हत्यार उगारण्यापूर्वी ठाणे पोलिसांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे ठरविले आहे. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना काही निरपराध नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर त्रास देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा हा काळ आहे. त्यांनाही त्रास दिला गेला. त्यामुळे माझा आक्षेप एसीपी अमित काळे यांच्या कार्यपद्धतीविषयी होता. पोलिसांविरोधात माझे काहीही म्हणणे नाही.
जितेंद्र आव्हाड

आव्हाड यांनी पोलिसांना केलेल्या शिवीगाळप्रकरणी पोलीस, तेथे उपस्थित असलेले नागरिक व परिस्थितीजन्य पुरावा यांच्या आधारावर चौकशी अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.
– विजय कांबळे, ठाणे पोलीस आयुक्त