मुंबई : अलिबाग मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी झालेली दोन वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने गुरुवारी निलंबित केली. या निर्णयामुळे दळवी यांची आमदारकी कायम राहणार आहे.प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी रायगड सत्र न्यायालयाने दळवी आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाला दळवी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठाने दळवी यांच्या याचिकेवर निर्णय देताना त्यांना सुनावण्यात आलेली शिक्षा निलंबित केली.
तत्पूर्वी, दळवी यांना दोषी ठरवण्याच्या आणि शिक्षा सुनावण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी दळवी यांनी केली होती. तसे न केल्यास दळवी यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते, असा युक्तिवादही वरिष्ठ वकील राजा ठाकरे आणि प्रदीप घरत यांनी केला होता.दुसरीकडे, दळवी यांच्या या मागणीला मूळ तक्रारदार लालासाहेब यांची बाजू मांडणारे वकील संजीव कदम यांनी विरोध केला. फौजदारी प्रकरणात एखादा आमदार किंवा खासदार त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरला आणि तुरुंगवासाची शिक्षा झाली तर तो आमदारकी किंवा खासदारकी गमावत असल्याचा दावाही कदम यांनी केला होता.