नेतृत्वाकडून डावलण्यात येत असल्याच्या भावनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार ईश्वर जैन हे बहुधा पक्षावर नाराज असून, या नाराजीतूनच त्यांचे आमदार पुत्र काँग्रेसच्या कळपात दाखल होत आहेत. आमदार मनीष जैन यांनी जळगावात आयोजित केलेल्या कापूस परिषदेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसची राज्यातील नेतेमंडळी उद्या जळगावमध्ये उपस्थित राहणार आहेत.
‘आमदार मनीष जैन मित्रमंडळा’ने आयोजित केलेल्या या परिषदेला काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नारायण राणे, राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, नसिम खान हे मंत्री हे उपस्थित राहणार आहेत. जळगावमध्ये सुरेश जैन यांनी साथ सोडल्यानंतर राष्ट्रवादीची ताकद घटली होती. सुरेश जैन यांचे एकेकाळचे निकटवर्तीय सोन्या-चांदीचे व्यापारी ईश्वर जैन यांना राष्ट्रवादीने राज्यसभेची खासदारकी दिली. राज्यमंत्री गुलाबराव देवकर हेसुद्धा घरकुल योजनेतील घोटाळ्यातील आरोपी आहेत. आता जैन पिता-पुत्रही पक्षापासून अंतर ठेवू लागल्याने पक्षाला वर्चस्व राखण्याकरिता प्रयत्न करावे लागतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla manish jain quit ncp may join congress
Show comments