विधानभवनाच्या आवारात पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार प्रदीप जैयस्वाल, राजन साळवी आणि जयकुमार रावळ यांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव विधीमंडळ कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत मांडला. 
शेकापचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला अहवाल विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांना सादर केला. या अहवालात जैयस्वाल, साळवी आणि रावळ हे निर्दोष असल्याचे म्हटले आहे. समितीच्या अहवालानंतर या तिन्ही आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
सूर्यवंशी यांना मारहाण केल्याबद्दल २० मार्च रोजी वळसे-पाटील यांनी क्षितीज ठाकूर, राम कदम, जैयस्वाल, साळवी आणि रावळ या पाच जणांना ३१ डिसेंबर २०१३पर्यंत निलंबित केले होते. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विधीमंडळाचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली होती.