पालिका अभियंत्याला मारहाण तसेच अन्य दोन गुन्ह्य़ांप्रकरणी मनसे आमदार राम कदम यांना पंतनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. मात्र न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर लगेच त्यांची तिन्ही प्रकरणांत जामिनावर सुटकाही करण्यात आली. १७ जानेवारी २०१३ रोजी घाटकोपरच्या भटवाडी येथे अनधिकृत बांधकामावर पालिकेमार्फत कारवाई सुरू होती. त्यावेळी आ. राम कदम यांनी या कारवाईला विरोध केला. एन प्रभागाचे उपअभियंता महेश फड यांना कदम आणि त्यांच्या सोबत असलेल्या १५ कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. तसेच फोनवरून धमकीही दिली होती. या प्रकरणात कदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय कदम यांच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल होते. त्यापैकी एक अनधिकृत बॅनर काढणाऱ्या पालिकेच्या पथकाच्या कारवाईत अडथळा आणणे आणि रेशनिंग अधिकाऱ्याला मारहाणीच्या गुन्ह्य़ांचा समावेश होता. या तिन्ही गुन्ह्यांत राम कदम यांना अटक करण्यात आलेली नव्हती. अखेर मंगळवारी पंतनगर पोलिसांनी कदम यांना अटक केली.
पोलिसांनी कदम यांना विक्रोळी येथील न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्यांना २४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर कदम यांनी लगेच जामिनासाठी अर्ज केला. त्यावर न्यायालयाने अभियंत्यास मारहाणप्रकरणी २५ हजार व अन्य दोन प्रकरणांत प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर कदम यांची सुटका केली.

Story img Loader