विधान भवनाच्या इमारतीमध्ये पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणारे मनसेचे आमदार राम कदम यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची त्यांच्या निवासस्थानी रविवारी भेट घेतली. पोलीस अधिकाऱ्यास मारहाण केल्यामुळे संतप्त झालेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनधरणी कशी करावी असा प्रश्न पडलेल्या कदम यांनी राणे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होती.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना राम कदम यांच्यासह पाच आमदारांनी विधान भवनाच्या इमारतीतच मारहाण केली होती. समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवर कधीही हात उचलू नयेत, असे आदेश राज ठाकरे यांनी सीएसटी येथील जाहीर सभेत दिले होते. मात्र कदम यांनी पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्यामुळे संतप्त झालेल्या राज ठाकरे यांच्या पुढे आपण कसे जायचे असा प्रश्न कदम यांना पडला आहे.
राज ठाकरे आणि राणे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे कदम यांनी राणे यांची रविवारी सायंकाळी वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.कदम आणि राणे यांच्यामध्ये तब्बल पाऊणतास चर्चा झाली. दरम्यान, राणे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी कदम त्यांच्या निवासस्थानी गेले होते, असे कदम यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा