मुंबई : जागेश्वरीतील जागेवरून ‘ईडी’ चौकशीचा ससेमिरा मागे लागलेले शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर हे लवकरच मूळ शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
वायकर यांची अलीकडेच ईडीने सखोल चौकशी केली होती. जोगेश्वरीत राखीव भूखंडावर हॉटेल उभारून आर्थिक फायदा उकळल्याबद्दल वायकर यांच्या विरोधात ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात त्यांच्या पत्नीच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. वायकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे एकेकाळी निकटवर्तीय मानले जात असत. मुंबई महानगरपालिकेची आर्थिक तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीचे वायकर यांनी अध्यक्षपदही भूषविले होते. ठाकरे व वायकर कुटुंबीयांनी रायगड जिल्ह्यात बेहिशेबी मालमत्ता केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. जोगेश्वरीमध्ये राखीव भूखंडावर वायकर यांनी आधी क्लब व नंतर हॉटेलचे बांधकाम सुरू केले होते. यातून वायकर यांनी पैशांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
हेही वाचा >>>मुंबई : सदनिका लाटण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर;,१० कोटींच्या फसवणूकीप्रकरणी १२ जणांना अटक
चौकशीतून बाहेर पडण्यासाठीच वायकर यांनी शिंदे गटाशी जवळीक साधल्याचे समजते. ठाकरे गटाला सोडचिट्ठी दिल्यास मदत करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. यामुळेच अलीकडेच मुंबई महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात आधीच्या भूमिकेत बदल करून वायकर यांना मदत होईल अशी मवाळ भूमिका घेतली. तेव्हाच वायकर हे ठाकरे गटाला रामराम करणार हे स्पष्ट झाले होते.
वायकर हे लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. या संदर्भात आमदार वायकर यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. अटकेच्या भीतीनेच वायकर शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता ठाकरे गटातून व्यक्त केली जात आहे.