मुंबई : मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी काही ठराविक मतदारसंघात कोणाविरुद्ध कोण उभे राहणार याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षातून शिवसेना (शिंदे) पक्षात गेलेले आमदार रवींद्र वायकर यांच्या मतदार संघाबाबतही प्रचंड उत्सुकता आहे. या मतदार संघात वायकर यांच्या पत्नीला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून वायकरांचा एकेकाळचा जवळचा कार्यकर्ता अनंत नर यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघात गुरु विरुद्ध चेला अशी राजकीय लढाई होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> “मी अजून जिवंत आहे”, झिशान सिद्दिकींचा वडिलांच्या मारेकऱ्यांना इशारा; म्हणाले, “तुम्ही त्यांना मारलंत, पण…”
जोगेश्वरी पूर्व मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात मराठी मत मोठ्या संख्येने आहेत. तसेच मुस्लिम मते जवळ पास १८ टक्के आहेत. शिवसेनेचे दोन तट पडल्यानंतर लोकसभा निवडणूकीच्यावेळी या मतदारसंघाने शिवसेना (ठाकरे) पक्षाला भरभरून मते दिली. त्यामुळे या मतदार संघात सध्या ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. विधानसभा निवडणूकीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे तेथे शिवसेनेच्या दोन गटात लढत होणार आहे. विद्यमान आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती व अवघ्या ४८ मताधिक्याने ते निवडून आले होते. त्यामुळे आता या मतदार संघात वायकरांच्या जागी शिंदे गटाकडून कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता आहे. वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटातून माजी नगरसेवक प्रवीण शिंदे हे देखील निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे समजते. महायुतीमध्ये भाजपच्या काही माजी नगरसेवकांनीही या जागेसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यात भाजपच्या माजी नगरसेविका उज्वला मोडक, प्रीती सातम यांचीही नावे चर्चेत आहे. मात्र शिवसेना (शिंदे) ही जागा सोडणार नाही हे निश्चित आहे.
हेही वाचा >>> Baba Siddique murder case: हल्लेखोरांना मदत करण्यासाठी मिळाले पाच लाख रुपये, बँक खात्यात जमा झाली रक्कम
या मतदारसंघासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाने जोरदार तयारी केली असून लोकसभेतील पराजयाचा वचपा काढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी माजी नगरसेवक अनंत नर यांच्या नावाची जोरदार चर्चा या भागात सुरू आहे. नर हे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात लोकांच्या गाठीभेठी घेतानाही दिसत आहेत. नर हे वायकरांचे एकेकाळचे खंदे समर्थक, निकटचे कार्यकर्ते होते. मात्र वायकर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतरही नर आणि त्यांच्यासारखेच काही कार्यकर्ते ठाकरे यांच्या शिवसेनेत ठाम राहिले. आता नर यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यास अप्रत्यक्षपणे वायकर आणि नर यांच्यातच म्हणजेच गुरु आणि शिष्यामध्येच ही लढत होणार आहे. नर हे गेली ३५ वर्षे शिवसेनेत असून गेली दहा वर्षे नगरसेवक आहेत. प्रभाग समिती, सुधार समिती, स्थापत्य समितीच्या अध्यक्षपदावर ते होते.
नर की किर्तीकर ? याच मतदार संघातून गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर यांचेही नाव चर्चेत आहे. अमोल किर्तीकर यांनी लोकसभेची निवडणूक वायकराच्या विरोधात लढवली होती. त्यामुळे त्यांना आधी वर्सोवा मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून किर्तीकर यांचेही नाव जोगेश्वरी पूर्व मतदारसंघासाठी चर्चेत आहे. त्यामुळे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून नर आणि किर्तीकर यांच्यात चुरस आहे.