डोंबिवलीतील हटवादी रिक्षाचालकांचे मीटर डाऊन करण्यासाठी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला असून शनिवारी सकाळी साडेआठ वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलिस आणि रिक्षा चालक-मालक संघटनांची बैठक बोलाविली आहे. रिक्षा भाडे नाकारणे व अन्य तक्रारी दूर करण्यासाठीही प्रयत्न केला जाणार असून ‘लोकसत्ता’ ने यासाठी आवाज उठविला होता.
इलेक्ट्रॉनिक मीटर बसविणे सक्तीचे होऊनही डोंबिवलीतील रिक्षाचालक मीटर बसविले असूनही टाकत नाहीत, काहींनी ते बसविलेही नाही. डोंबिवली पूर्व-पश्चिम परिसरात प्रवास करण्यासाठी मीटर न टाकता मनमानी भाडेआकारणी केली जाते. रिक्षाचालक बरेचदा भाडे नाकारतात. याबाबत तक्रारी केल्यावर चव्हाण यांनी आरटीओ अधिकारी संजय डोळे आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. रिक्षा संघटनांशीही चर्चा केली असून सर्वानी मीटर प्रमाणे भाडेआकारणीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली जाणार आहे.
मीटर न टाकल्यास संबंधित रिक्षात बसून प्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा वाहतूक पोलिसांकडे दूरध्वनीवर प्रवाशांनी तक्रार करावी. त्यावेळी रिक्षाचालकावर कारवाई झाल्यास संघटनांनी त्याची बाजू घेऊन त्यात हस्तक्षेप करू नये, अशा सूचनाही दिल्या जाणार आहेत. त्यामुळे आता डोंबिवलीत रिक्षांचे मीटर डाऊन होण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader