बुधवारच्या पावसामुळे मुंबईकरांचे हाल सुरू असताना पालिकेची यंत्रणा जागेवर नव्हती, अनेक ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप सुरू नव्हते, तर आपत्कालीन विभागातील कर्मचारी दूरध्वनी उचलत नव्हते असे आरोप आमदार सुनील प्रभू यांनी केले आहेत. प्रभू यांनी याप्रकरणी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून तक्रारही केली आहे.
हेही वाचा >>> अतिवृष्टीबाधित जोगेश्वरीवासियांना नुकसान भरपाई द्या- जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
मुंबईत बुधवारच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या नियोजनावर टीका होऊ लागली आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट दिला तेव्हा पालिकेची यंत्रणा सुसज्ज नव्हती असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे दिंडोशीतील आमदार सुनील प्रभू यांनी केला आहे. पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडे दूरध्वनी केले असता कोणी प्रतिसादच देत नसल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या होत्या. पावसाचे पाणी उपसण्यासाठी असलेले पंपही बंद पडल्याच्या तक्रारीही आल्या होत्या. रस्त्यावरही प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. प्रवासी गाड्यांमध्ये अडकून पडले होते. अशा आपत्कालीन परिस्थिती मुंबईकरांना सुविधा मिळू शकत नव्हती, त्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले असेही प्रभू यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>> तृतीयपंथीयाशी प्रेमसंबंध असल्याचे समजताच पत्नीनं मागितला घटस्फोट, पतीनं पत्नीच्या चेहर्यावर ॲसिड फेकलं
याबाबत प्रभू म्हणाले की, मुंबईतील अनेक ठिकाणी पंप बंद होते. नियंत्रण कक्षातील दूरध्वनी कोणी उचलत नव्हते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वाटले पावसाळा संपला त्यामुळे यंत्रणा सज्ज नव्हती. रस्त्यांवर वाहतूक कोंडी प्रचंड झाली होती. गाड्यांमध्ये तीन तीन तास लोक अडकले होते. मधुमेह असलेले अनेक प्रवासी गाड्यांमध्ये अडकून पडले होते. आपत्कालीन परिस्थितीत सज्ज राहण्याच्या सूचना विभाग प्रमुखांना द्याव्या, अशी मागणी प्रभू यांनी केली आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यानंतर दोन तीन तासात पालिका प्रशासनाने यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या होत्या, अशी प्रतिक्रिया पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. गेले बरेच दिवस पाऊस पडलेला नसल्यामुळे पंप सुरू आहेत का याची चाचणी घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या. पंपामध्ये डिझेल आहे का, वीज जोडणी आहे का याची खातरजमा करण्याचे आदेश दिले होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.