मुंबई : विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात सोमवारी मराठी भाषा दिनानिमित्त साहित्याची ज्ञानयात्रा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राजकीय भाषणाने कंटाळवाणा होऊ लागलेल्या कार्यक्रमात आमदार यामिनी जाधव यांच्या कविता वाचनाने उत्साह संचारला. कधी तरी धोक्यात पडाव माणसानं, कधी तरी शहाण्यासारखं वागावं माणसानं, या  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावरील भाष्याने कार्यक्रमात खऱ्या अर्थाने जान आणली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधिमंडळाच्या वतीने,  वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित साहित्याची ज्ञानयात्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषासंबंधीच्या कार्यक्रमाला मोजक्याच आमदारांची उपस्थितीत होती.  मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मंत्री काही साहित्यिक नसतात, परंतु शासन म्हणून मराठी भाषा, साहित्यिक यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. इतरही राजकीय भाषणाने काहीशा निरस वातावरणात उत्साह आणला तो आमदार यामिनी जाधव यांच्या कविता वाचनाने.  व्यासपीठावर येऊन यामिनी जाधव यांनी माणसाच्या जगण्याविषयीची कविता दमदारपणे सादर केली. माणसाच्या जगण्यात हळुवारपणा असावा, तसाच बेधडकपणाही असावा, अशी खुलेआम साद घालणारी कविता होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सादर केलेल्या, कधी तरी धोक्यात पडाव माणसानं, कधी तरी शहाण्यासारखं वागावं माणसानं, या काव्यपंक्तीने मुख्यमंत्र्यांसह सर्वानीच  दाद दिली.

मराठी विश्वभाषा : मुख्यमंत्री

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जी भाषा जात पात विसरून सर्वाना सामावून घेते तीच विश्वाची भाषा बनते, हे सर्व गुण मराठीत आहेत. अतिशय प्राचीन कालापासून अनेकांनी ही  भाषा समृद्ध केली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla yamini jadhav commentary on the rebellion of the shinde through poetry ysh
Show comments