मुंबई: वांद्रे येथील लिंक स्क्वेअर मॉलला लागलेली आग विझलेली नसतानाच आरोपांचा धूर निघू लागला. अग्निशमन दलाच्या बेजबाबदारपणामुळे आग वाढली, असा आरोप आमदार झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. सिद्दीकी यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

मात्र अग्निशमन दलाने सर्व आरोप फेटाळले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.वांद्र येथील लिंक स्क्वेअर मॉलला मंगळवारी पहाटे लागलेली आग संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आली. ही आग इतकी भीषण होती की मुंबई अग्निशमन दलाने क्रमांक चारची वर्दी दिली होती. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) यांनाही पाचारण करण्यात आले होते.

जमिनीखाली तळघरात (बेसमेंट) तीन मजले, तळमजला (ग्राऊंड फ्लोअर) आणि वर तीन मजले अशी रचना असलेल्या मॉलमधील तळघरातील क्रोमाच्या शोरूमध्ये ही आग लागली होती. ही आग नंतर संपूर्ण मॉलमध्ये पसरली होती. संपूर्ण मॉल या आगीच्या भक्ष्यस्थानी गेला असून मॉलमधील दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग विझवण्यास तब्बल १२ तास लागले असून आगीत मॉलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

दरम्यान, हा मॉल वांद्रे पूर्व येथील माजी आमदार झिशान सिद्दीकी यांल्या मालकीचा आहे. या इमारतीच्या निर्माणात त्यांची सहभागी आहे. मॉलला आग लागल्याचे समजताच पहाटेपासून सिद्दीकी घटनास्थळी दाखल होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अग्निशमन दलावर आरोप केले. ते म्हणाले की, अग्निशमन दल येथे पोहोचण्यापूर्वी आम्हीआग विझवण्याचा प्रयत्न करीत होतो.

आतमधील कर्मचाऱ्यांना आग विझवण्याची यंत्रणा हाताळता येत नसल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. आम्ही सकाळी ४ च्या दरम्यान येथे पोहोचलो. त्यावेळी इथे ना पोलीस होते ना अग्निशमन दलाचे जवान. सकाळी ६ वाजता सर्वजण इथे दाखल झाले, असा आरोप त्यांनी केला. अग्निशमन दलाच्या बेजबाबदारपणामुळे ही आग वाढली, असाही आरोप सिद्दीकी यांनी केला.

सिद्दीकी यांनी केलेले आरोप अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी फेटाळले. अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर हे आग विझवण्यासाठी स्वत: घटनास्थळी पूर्णवेळ उपस्थित होते. ते म्हणाले की, आगीबाबत पहाटे ३.५८ ला वर्दी मिळाली होती. त्यानंतर ४.१७ ला आग पहिल्या स्तराची असल्याचे घोषित करण्यात आले. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर गाड्या उभ्या करणे, कुठून आत शिरता येईल याची पाहणी करणे यामध्ये काही मिनिटे जातात.

ही इमारत काचेच्या तावदानांची होती, आत खूप धूर आणि प्रचंड उष्मा होता. त्यामुळे काच तोडून आत शिरावे लागत होते. मात्र तरीही आग विझवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शिकस्त केली.दरम्यान, मॉलमध्ये प्रचंड धूर आणि त्यात ठिकठिकाणी सामान कसेही भरून ठेवलेले होते, प्रत्येक गाळ्यात पोटमाळे होते. त्यामुळे आत शिरणेही मुश्कील झाले होते. श्वसन उपकरण वापरून आम्ही आत प्रवेश केला. या ठिकाणी सुगंधी अत्तर, कपडे, रबर, चामड्याच्या वस्तू यांची मोठी दुकाने व साठा होता. त्यामुळे आग पसरली व धूर वाढला. त्यामुळे आग विझवायला वेळ लागल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आगीची सर्वंकष चौकशी करा – ॲड. आशिष शेलार यांचे आयुक्तांना निर्देश

वांद्रे येथे लागलेल्या आगीची अतिरिक्त आयुक्तांच्या पातळीवर सर्वंकष चौकशी करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांना दिले. आगीची घटना दुदैवी असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसली तरी इमारत आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील व्यापारी आणि या इमारतीच्या निर्माणात सहभागी असलेल्या माजी आमदार झिशान सिध्दीकी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्याची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. असे ॲड. शेलार म्हणाले.

नियमभंग करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा – गायकवाड

वांद्रे पश्चिम येथील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये लागलेल्या आगीत १०० हून अधिक दुकाने, शोरूम्स आणि व्यावसायिक गाळे जळून खाक झाले. मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले. या घटनेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. या मॉलमध्ये आग लागल्यास तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती साधने आणि व्यवस्था होती का, सर्व अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले होते का, शेवटची अग्निसुरक्षा तपासणी केव्हा करण्यात आली होती, याची माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रत्येक वेळी आग लागते, तेव्हा एक दिवसासाठी प्रतिकात्मक कारवाई केली जाते. मग पुन्हा नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू होतात. हे असे किती काळ चालू राहणार, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुंबईतील बहुतांश मॉल्स आणि थिएटर्स हे मृत्यूचे सापळे आहेत. सर्व सार्वजनिक इमारती, मॉल्स आणि थिएटर्स यांची नव्याने अग्निसुरक्षा तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावेत. नियमभंग करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी, फक्त प्रतिकात्मक नोटीस देऊ नये, अशीही मागणी गायकवाड यांनी केली.