संसदीय लोकशाहीत अतिशय लाजीरवाणी ठरेल, अशी घटना मंगळवारी महाराष्ट्राच्या विधान भवनात घडली. राज्याचे कायदेमंडळ असलेल्या विधान भवनात आमदारांनी एका पोलिस अधिकाऱयाला बेदम मारहाण केली. आमदारांच्या मारहाणीमुळे बेशुद्ध झालेल्या संबंधित अधिकाऱयाला अक्षरशः स्ट्रेचरवरून विधान भवनातून रुग्णालयाकडे नेण्यात आले. सचिन सूर्यवंशी असे या अधिकाऱयाचे नाव असून, ते सहायक पोलिस निरीक्षक आहेत.
नालासोपाऱयातील बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार रावळ यांच्यावर सूर्यवंशी यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
वांद्रे-वरळी सागरी सेतूमार्गावर सूर्यवंशी यांनी आमदार ठाकूर यांच्यासोबत सोमवारी गैरवर्तणूक केली आणि त्यांच्या चालकाकडून दंड वसूल केला. त्यानंतर ठाकूर यांनी सूर्यवंशी यांच्याविरुद्ध विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावानंतर राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सूर्यवंशी यांना विधीमंडळात येण्याचे आदेश दिले. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर सूर्यवंशी हे प्रेक्षक गॅलरीमध्ये बसले होते. सूर्यवंशी प्रेक्षक गॅलरीमध्ये बसल्याचे कळताच या आमदारांनी तिथे जाऊन त्यांना मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केल्यामुळे ते तिथे बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलविण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा