मुंबई : विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्याकरिता महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी आमदारांना सुरक्षित जागी ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी उद्योगपती मुकेश अंबानी पुत्राच्या शाही विवाहामुळे मुंबईत पंचतारांकित हॉटेल्स मिळणे कठीण झाले आहे. यामुळेच भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
विधान परिषदेसाठी शुक्रवारी चुरशीची निवडणूक होत आहे. पुरेशी मते नसतानाही शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील हे तगडे उमेदवार रिंगणात आहेत. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने घोडेबाजार होण्याची चिन्हे आहेत. ‘लक्ष्मीदर्शना’मुळे मतांची फाटाफूट होण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट सावध झाला आहे. भाजपच्या वतीने बुधवारपासून तीन दिवस आमदारांना एकत्रित ठेवण्यात येणार आहे. शिवसेना शिंदे गटानेही आपल्या आमदारांना सुरक्षित जागी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गुरुवार-शुक्रवार आमदारांना एकत्र ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> शाळेभोवती तळे न साचताही सुट्टी!
वांद्रे-कुर्ला संकुल तसेच विमानतळ परिसरातील बहुतांशी हॉटेल्स आरक्षित झाली आहेत. दक्षिण मुंबईतही मोठ्या प्रमाणावर खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. यामुळे आमदारांना सुरक्षित ठेवण्याकरिता हॉटेल्स मिळणे कठीण गेल्याचे महायुतीच्या एका नेत्याने सांगितले. महायुतीने आमदारांना सुरक्षित ठेवले असले तरी महाविकास आघाडीने तरी तसा निर्णय घेतलेला नाही. काँग्रेसने गुरुवारी पक्षाच्या आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केले आहे. त्यात आमदारांना मतदान कसे करायचे याचे मार्गदर्शन केले जाईल. राष्ट्रवादी शरद पवार गटानेही आमदारांसाठी वेगळी व्यवस्था केलेली नाही. शिवसेना ठाकरे गटाने अजून तरी आमदारांना काही निरोप दिलेले नाहीत, असे सांगण्यात आले.
पंचतारांकित बडदास्त…
विधान परिषद निवडणुकीसाठी तीन दिवस पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यास मिळणार असल्याने भाजप व शिंदे गटाचे आमदार खूश आहेत.