विधान भवनाच्या आवारात पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राम कदम आणि क्षितीज ठाकूर या दोघा आमदारांना ५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिले. ‘आम्ही गुन्हेगार नसल्याने जामिनावर सुटका झाल्यानंतर पळून जाणार नाही’, असा दावा करीत दोघांनीही नंतर लगेचच जामीनासाठी केलेल्या अर्जावरील निर्णय न्यायालयाने सोमवापर्यंत राखून ठेवला. त्यामुळे कदम आणि ठाकूर यांना सोमवापर्यंत आर्थर रोड कारागृहात मुक्काम करावा लागणार आहे.
पोलिसांकडे शरणागती पत्करल्यावर झालेल्या एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर कदम आणि ठाकूर या दोघांना शुक्रवारी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. मात्र त्यांना पोलीस कोठडीची गरज नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्याने न्यायालयाने या दोघांना ५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर लगेचच दोघांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला. ‘आम्ही स्वत:हून पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. त्यामुळे जामीन मिळाल्यास पळून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असा दावा कदम आणि ठाकूर यांनी जामीन अर्जात केला आहे. कदम आणि ठाकूर दोघेही आमदार असून त्यांच्याकडून पुरावे नष्ट करण्याची शक्यता नसल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी केला. दोघेही पोलिसांना तपासात सहकार्य करीत असून त्यांनी या मारहाणीत सहभागी असलेल्या अन्य काही आमदारांची नावेही पोलिसांना दिली असल्याचे मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले.
आमदार कदम यांच्याविरुद्ध यापूर्वीही काही गुन्हे दाखल असून त्यातील काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन अथवा जामीन मंजूर केलेला आहे. अर्धवट सत्य दाखवून हे प्रकरण मोठे केले जात असून एका असहाय्य पोलिसाला बेदरकारपणे मारहाण केल्याचे चित्र उभे केले जात असल्याचा आरोपही मुंदरगी यांनी केला.
सूर्यवंशी यांना कुठल्याही प्रकारची जखम झालेली नाही वा मार लागलेला नाही, असा दावा करीत त्यांनी कदम आणि ठाकूर यांची जामिनावर सुटका करण्याची विनंती न्यायालयाकडे केली. दुसरीकडे कदम यांच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल असल्याने ते पुरावा नष्ट करू शकतात, अशी शक्यता सरकारी वकिलांनी कदम यांना जामीन देण्यास तीव्र विरोध केला. दोघांनी सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करून अजामीनपात्र गुन्हा केलेला आहे.

Story img Loader