मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक अधिकारी अपात्र असल्याच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्य सरकारने तातडीने पात्र निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्त करून नियोजित वेळापत्रकानुसार गुरुवारी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. मात्र ३ एप्रिल २०२५ रोजी पुन्हा झालेल्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने मतदान प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया दुपारी १२.३० च्या सुमारास थांबविण्यात आली. या निर्णयामुळे प्रथमच मतदान प्रक्रिया थांबविण्यात आल्याने डॉक्टरांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसार ३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सुरू झाली. मात्र त्याचवेळी निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने बुधवारी दिलेले निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश कायम ठेवले. यासंदर्भातील सूचना सरकारी वकील आदित्य पांडे यांनी दूरध्वनीद्वारे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला दिल्या. यामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार मतदान प्रक्रिया त्वरित थांबविण्याचे व लिफाफे आणि मतपेट्या विहीत कार्यपद्धतीने सीलबंद करून जिल्हा कोषागारात ठेवण्याचे निर्देश दिले होते. तसेच नोंद झालेल्या मतदानाच्या माहितीसह शासनास तात्काळ अहवाल सादर करावा व याबाबत सर्व उमेदवारांनादेखील कळवावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार राज्यातील विविध मतदान केंद्रांवर सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया दुपारी १२.३० च्या सुमारास थांबविण्यात आली.
दरम्यान, बुधवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी अपात्र निवडणूक अधिकाऱ्याच्या नियुक्तीवरून निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश दिले होते. यावेळी राज्य सरकारने तातडीने निवडणूक अधिकाऱ्याची बदली करून अवर सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आणि निवडणूक कायम ठेवली होती. वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने परिषदेची निवडणूक प्रक्रिया राबविल्याने सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. त्यामुळे यापुढे कोणत्याही चुका होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. अचानक निवडणूक स्थगित झाल्याने त्याचा परिणाम डॉक्टरांच्या मानसिकतेवर होण्याची शक्यता डॉ. शरद गायकवाड यांनी व्यक्त केली.
निवडणूक प्रक्रियेमध्ये राज्य सरकारचा गलथानपणा न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाला. काही जणांच्या राजकारणामुळे परिषदेच्या निवडणुकीचा खेळखंडोबा झाला. अनेक डॉक्टरांना निवडणूक रद्द झाल्याने मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. मात्र आता योग्य आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक होण्याची शक्यता अधिक दृढ झाल्याचे मत हीलिंग हँड्स युनिटी पॅनलचे उमेदवार डॉ. तुषार जगताप यांनी व्यक्त केले.
निवडणूक अधिकाऱ्याच्या पात्रतेवर शंका असल्याने बुधवारी निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र गुरुवारी स्थगितीचे आदेश देण्यामागचे नेमके कारण पहावे लागेल. तसेच यापूर्वी न्यायालयाने निवडणुका होऊन दिल्या, त्यानंतर मतमोजणीवर स्थगिती दिली होती. प्रथमच निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती आणण्यात आली आहे. त्यामुळे पुढील प्रक्रियेबाबत संभ्रमाचे वातावरण असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव संतोष कदम यांनी सांगितले.