मुंबई : घाटकोपर मेट्रो स्थानकातील मोठ्या पादचारी पुलावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी अखेर मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) आणि मध्य रेल्वेने पुढाकर घेतला आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करता येतील यासाठी बैठकांच्या माध्यमातून चर्चा सुरू आहे. लवकरच यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
घाटकोपर रेल्वे स्थानकाला जोडणारा पादचारी पूल मेट्रो १ (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) मार्गिकेतील घाटकोपर मेट्रो स्थानकालाही जोडला जातो. मागील काही दिवासांपासून सकाळी आणि सायंकाळी या पादचारी पुलावर मोठी गर्दी होताना दिसते. यातील बहुतांश गर्दी ही घाटकोपर रेल्वे स्थानकातून पुढे मेट्रोने मरोळ, अंधेरी, वर्सोव्याला जाणाऱ्यांची असते. पादचारी पुलावर वाढणारी गर्दी पाहता चेंगराचेंगरी, अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. असे असताना मध्य रेल्वे असो वा एमएमओपीएल यांच्याकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जाताना दिसत नाही. यासंबंधीचे वृत्त प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर अखेर एमएमओपीएलला जाग आली आहे.
गर्दी नियंत्रित करण्याबरोबरच वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी काय करता येईल याबाबत मध्य रेल्वे आणि एमएमओपीएल यांच्यात बैठकांच्या माध्यमातून चर्चा सुरू आहे. यादृष्टीने नेमक्या काय उपाययोजना करता येतील हे निश्चित करून लवकरच आवश्यक ती पाऊले टाकली जातील, अशी माहिती एमएमओपीएलच्या प्रवक्त्याने दिली.