चार महिन्यांत केवळ २६ लाख ६३ हजार जणांनीकेला भुयारी मेट्रो प्रवास
मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसी मार्गिकेवरून प्रतिदिन चार लाख प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात या मार्गिकेवर प्रतितिन केवळ २० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. ७ ऑक्टोबर २०२४ ते २० फेब्रुवारी २०२५ या चार महिन्यांमध्ये केवळ २६ लाख ६३ हजार ३७९ प्रवाशांनी ‘मेट्रो ३’मधून प्रवास केला. ही प्रवासी संख्या अत्यंत कमी असून प्रवासी संख्या वाढविण्याचे आव्हान मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन समोर (एमएमआरसी) आहे.
‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेचे काम एमएमआरसी करीत आहे. या मार्गिकेवरील आरे – बीकेसी दरम्यानचा १२.६९ किमी लांबीचा टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. त्यामुळे मुंबईकरांचे भुयारी मेट्रोतून प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. मुंबईतील ही पहिली भुयारी मेट्रो असून प्रवास अतिजलद होण्याच्या शक्यतेमुळे या मार्गिकेला मुंबईकरांकडून प्रचंड प्रतिसाद मिळेल, असा अंदाज होता. आरे – बीकेसी मार्गिकेवरून प्रतिदिन चार लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज यासंदर्भातील एका अभ्यासानुसार व्यक्त करण्यात आला आहे. पण आरे – बीकेसी मार्गिका सुरू होऊन चार महिने उलटले तरी दैनंदिन प्रवासी संख्या जेमतेम २० हजारावर पोहोचली आहे. एमएमआरसीने ‘एक्स’ समाजमाध्यमावरून दिलेल्या माहितीनुसार ७ ऑक्टोबर २०२४ – २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान आरे – बीकेसी मार्गिकेवरून एकूण २६ लाख ६३ हजार ३७९ प्रवाशांनी प्रवास केला.
चार महिन्यांतील एकूण प्रवासी संख्या लक्षात घेता प्रतिदिन प्रवासी संख्या सरासरी २० हजार इतकी होत आहे. दरम्यान, चार महिन्यांच्या कालावधीत आरे – बीकेसी मार्गिकेवरून मेट्रोच्या एकूण २९ हजार १६२ फेऱ्या झाल्या. चार महिने झाले तरी प्रवासी संख्या वाढू शकलेली नाही. त्यामुळे आता प्रवासी संख्या वाढविण्याचे आव्हान एमएमआरसीसमोर आहे. सूंपर्ण ‘मेट्रो ३’ मार्गिका सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या वाढेल, असा विश्वास ‘एमएमआरसी’ला आहे. त्यामुळेच आता लवकरात लवकर बीकेसी – आचार्य अत्रे चौक असा टप्पा २ अ वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने ‘एमएमआरसी’ने कामाला वेग दिला आहे. मार्चअखेरपर्यंत हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. तर जून-जुलैमध्ये आचार्य अत्रे चौक – कुलाबा असा २ ब वाहतूक सेवेत दाखल करण्याचे ‘एमएमआरसी’ने नियोजन आहे. त्यामुळे जून-जुलैमध्ये संपूर्ण ‘मेट्रो ३’ मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रतिसाद मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.