मुंबई :मेट्रो स्थानकावरून इच्छितस्थळी जाता यावे, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी)‘मल्टी-मॉडेल इंटिग्रेशन’ सेवेच्या माध्यमातून टी-२ टर्मिनल मेट्रो स्थानक ते विमानतळ (पी४ एंट्री) दरम्यान विशेष मोफत बससेवा सुरू केली. तर दुसरीकडे बेस्ट, वाहतूक पोलीस, विमानतळ प्राधिकरण आणि मुंबई पालिकेच्या मदतीने नवी बस मार्गिका आणि बेस्ट बस थांब्यांची उभारणी, पादचारी पुलाची बांधणी करण्यासह विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण झाल्यास ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील प्रवास सुकर होईल, असा दावा ‘एमएमआरसी’ने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे-बीकेसी मार्गिकेवरून सध्या दिवसाला २५ हजार प्रवासी ये-जा करीत आहेत. भुयारी मेट्रो प्रवासाचा ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील हा आरे-बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा सुरू झाला. मात्र, या मार्गिकेवरील प्रवासी संख्या सध्या खूपच कमी आहे. त्यातच मेट्रो स्थानकापासून इच्छितस्थळी जाण्यासाठी आवश्यक त्या कोणत्याही सुविधा मेट्रो स्थानकांबाहेर उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याच कारणामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर भुयारी मेट्रोचा प्रवास टाळताना दिसत आहेत. यावरून एमएमआरसीवर टीका होत आहे.

हेही वाचा >>> ‘लोकसत्ता लोकांकिका’ची नांदी! मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी; सविस्तर वेळापत्रक लवकरच

या सर्व बाबी लक्षात घेऊन भुयारी मेट्रो प्रवास सुकर करून या मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढविण्यासाठी ‘एमएमआरसी’ने पावले उचलली आहेत.

आरे-बीकेसीदरम्यानच्या १० मेट्रो स्थानकांबाहेर ‘मल्टी-मॉडल इंटिग्रेशन’ सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचता यावे, यासाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सुविधाएमएमआरसीमार्फत उपलब्ध करण्यात आल्या आहेत,अशी माहिती ‘एमएमआरसी’च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली.

हेही वाचा >>> अल्पवयीन मुलाच्या ‘ट्वीट’मुळे विमानांमध्ये बॉम्बची अफवा; मित्राला गुन्ह्यात अडकविण्यासाठी खोटा संदेश केल्याचे उघड

बससेवा वेळापत्रक

सोमवार ते शुक्रवार या काळात बससेवा सकाळी ६.३० ते रात्री ११ दरम्यान, तर रविवारी सकाळी ८.१५ ते रात्री ११ या कालावधीत सुरू राहील. या २१ प्रवासी क्षमतेच्या बस प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आल्या असून प्रत्येक १५ मिनिटांनी बस सुटेल.

भुयारी मेट्रोसाठी सुविधा

● ‘मल्टी-मॉडल इंटिग्रेशन’अंतर्गत मेट्रो स्थानकाबाहेर पालिका, बेस्ट, वाहतूक पोलिस आणि विमानतळ प्राधिकरणाच्या मदतीने विविध सुविधा उपलब्ध करण्यात येतील.

● आरे-बीकेसीदरम्यानच्या सर्व स्थानकांबाहेरील पदपथांची दुरुस्ती आणि सुधारणा काम हाती घेण्यात आले आहे. काही ठिकाणी पादचारी पुलांचीही बांधणी प्रगतिपथावर आहे. त्याच वेळी बेस्ट बसमार्गांची पुनर्रचना करून बेस्टने सर्व स्थानके जोडली जातील.

● मेट्रो स्थानकांबाहेर बसथांबे, प्रवाशांना उभे राहण्यासाठी योग्य ती सुविधाही उपलब्ध

● १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व स्थानके बेस्ट बसने जोडली जातील. टी २ टर्मिनल मेट्रो स्थानक ते विमानतळ पी ४ एंट्रीपर्यंतचे अंतर पार करण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून टी २ टर्मिनल ते विमानतळ पी४ एंट्री दरम्यान विशेष मोफत बस सेवा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrc launched free bus service between t 2 terminal metro station to airport p4 entry mumbai print news zws