लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील मेट्रो स्थानकांची नावे केवळ इंग्रजीत असल्याचा, मेट्रो ३ ला मराठीचा द्वेष आहे असा आऱोप नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे. ताबडतोब देवनागरीत नावे लिहिली नाहीत तर आंदोलन करु असा इशाराही मनसेने मुंबई मट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) दिला आहे.

एमएमआरसीने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मेट्रो स्थानकावरील आरे ती बीकेसी दरम्यान सर्व स्थानकांवर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत स्थानकांच्या नावांचे फलक ठकळपणे लावण्यात आले आहेत. तर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक २ अ टप्पा अद्याप कार्यान्वित झालेला नसून या टप्प्यातील स्थानकांवर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत स्थानकांच्या नावाचे फलक लावण्याचे काम सुरु असल्याची माहिती एमएमआरसीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

एमएमआरसीच्या ३३.५ किमीच्या मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा वाहतूक सेवेत दाखल आहे. तर आता लवकरच, येत्या काही दिवसातच बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक असा टप्पा २ अ वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. त्यानुसार या टप्प्यातील फिनिशिंगची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अशावेळी प्रभादेवी मेट्रो स्थानकाबाहेर आयसीआयसीआय लोम्बार्ड प्रभादेवी स्थानकाचे नाव इंग्रजीत देण्यात आले आहे. मराठीत स्थानकाचे नाव नसल्याचा आरोप करून मनसेचे संतोष धुरी यांनी सोमवारी, ७ एप्रिलला एमएमआरसीला एक पत्र पाठवून मायबोली मराठीला का वगळण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला आहे. मेट्रोला मराठीचा द्वेष का असाही प्रश्न विचारत आंदोलनाचा इशारा दिला.

या पत्रानंतर एमएमआरसीने बुधवारी मनेसेने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मेट्रो- ३ च्या टप्पा २अ मधील कामे प्रगतीपथावर आहेत. या टप्प्यातील मेट्रो स्थानकांवर सध्या नामफलक लावण्याचे काम सुरू असून लवकरच सर्व स्थानकांची नावे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ठळकपणे लावली जातील, याची हमी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) देत आहे. यापूर्वी आरे ते बीकेसी दरम्यानचा मेट्रो-३ चा टप्पा सुरू झाला असून, त्या मार्गावरील सर्व स्थानकांवर मराठी आणि इंग्रजीत नामफलक आहेत.

अभिजात दर्जा मिळालेली मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे आणि तिचा मान राखणे ही आमची जबाबदारी आहे. मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसीदरम्यानच्या सर्व मेट्रो स्थानकांची नावे मराठी आणि इंग्रजीत ठकळपणे लिहिण्यात आली आहेत. इतर माहितीही मराठीत आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्ग टप्पा २ अद्याप कार्यान्वित झालेला नाही. या टप्प्यातील मेट्रो स्थानकांवर नावांचे फलक लावण्याची कामे सुरु आहेत. तेव्हा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत नावांचे फलक लावण्याची कामे सुरु आहेत. प्रभादेवी स्थानकावरही मराठीत नावांचे फलक लावण्याचे काम सुरु असल्याचे सांगून एमएमआरसीने मनसेचे आरोप फोटाळून लावले आहेत. मराठी भाषेचा वापर करण्याच्या राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन एमएमआरसीकडून करण्यात येत असून यापुढेही करण्यात येईल असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

याविषयी मनसेचे संदिप देशपांडे यांना विचारले असता प्रभादेवी मेट्रो स्थानकावर सर्व फलक इंग्रजीत आहेत. जर आता एमएमआरसीकडून मराठी फलक लावण्याची कामे सुरु असतील तर ही चांगली गोष्ट आहे. त्यांचे अभिनंदन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.